राज्यातील आठ कोटी नागरिकांचा पहिला डोस पूर्ण – राजेश टोपे


जालना – राज्य सरकारकडून ओमिक्रॉन वाढू नये यासाठी खबरदारी घेतली जात असून, दररोज दीड ते दोन लाख नागरिकांची तपासणी होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात आगामी १५ ते २० दिवसांत १०० टक्के लसीकरण होणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी बोलून दाखवले. राजेश टोपे जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. ओमिक्रॉन हा संसर्गजन्य असला, तरी तो धोकायदायक नसल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले.

तसेच, सध्या राज्यात ओमिक्रॉनचे ५४ रुग्ण असून प्रोटोकॉलनुसार दररोज दीड ते दोन लाख नागरिकांची टेस्टिंग केली जात आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली. त्याचबरोबर राज्यात आठ कोटी नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून येत्या पंधरा ते वीस दिवसांत महाराष्ट्र शंभर टक्के लसीकरण होईल, असेही टोपे यांनी म्हटले आहे.

आम्ही सुरूवातीपासूनच ओमिक्रॉनबाबत सांगत आलेलो आहोत की, आपण या व्हेरिएंटला खास करून ज्याला भीतीदायक म्हणू असे नाही, पण हे नक्की आहे की तो खूप संसर्गजन्य आहे. आतापर्यंत ५४ जण आढळलेले आहेत आणि आपल्या टेस्टिंग देखील जलगतीने सुरू आहेत. या सर्वांवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. हायरिस्क कंट्रीजमधून येणाऱ्या विमानांमधील प्रवशांचे आरटीपीसीआर केले जात आहेत. स्क्रीनिंग केले जात आहे आणि त्यामध्ये जर ते पॉझिटिव्ह आढळले, तर पुढील जिनोमिंग सिक्वेंसिंगसाठी पाठवले जात आहे.