कोलकाता महापालिका निवडणुकीत ममता बॅनर्जींची जादू कायम; भाजपला दोन आकडी संख्याही गाठण्यात अपयश


कोलकाता – सध्या पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी करत असताना दुसरीकडे राज्यात पालिका निवडणुकांमधील निकाल आज जाहीर होत आहेत. ही निवडणूक ममता बॅनर्जींच्या राजकीय वाटचालीच्या दृष्टीने महत्वाची असून त्यांच्यासमोर विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीतही मोठा विजय मिळवत पुन्हा एकदा आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याचे आव्हान आहे. दरम्यान सुरुवातीचे कल हाती आले आहेत, त्यानुसार ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा भाजपला जोरदार दणका दिला आहे.

तृणमूल काँग्रेसने कोलकाता महापालिका निवडणुकीत विजयी वाटचाल सुरु केली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार तृणमूल १३४ जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे भाजप ३, डावे ४ आणि काँग्रेस फक्त दोन जागांवर आघाडीवर आहे.

कोलकातामधील १६ मतदान केंद्रांवर १४४ वॉर्डमध्ये मतमोजणी सुरु आहे. मतमोजणी सुरु असल्यामुळे कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच २०० मीटर परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना २०० मीटरच्या अंतरात प्रवेश करण्याची परवानगी नाही. सुरक्षेची पूर्ण जबाबदारी कोलकाता पोलिसांकडे आहे. याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर उपस्थितांना दोन्ही लस घेतलेले असणे अनिवार्य आहे.

दरम्यान पालिका निवडणुकीत हिंसाचार आणि घोटाळा झाल्याचा आरोप करत भाजप आणि सीपीएमने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. याप्रकरणी २३ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. भाजप, काँग्रेस आणि सीपीएमने पालिका निवडणूक रद्द करत पुन्हा एकदा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.