कर्नाटकमध्ये वा कुठेही, महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही – फडणवीस


मुंबई – राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीवर निशाणा साधत यावेळी त्यांनी निवडक निषेध केला जात असल्याची टीका केली. तसेच सत्ताधारी पक्षाचे आमदार बूट घालून महाराजांच्या पुतळ्यावर चढले होते याची आठवण करुन देत, तेव्हा मूग गिळून गप्प का बसले होते का ? अशी विचारणा केली. देवेंद्र फडणवीस अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कर्नाटकमध्ये वा कुठेही, सहन केला जाणार नाही. याबाबत कर्नाटक सरकारनेही स्पष्ट भूमिका मांडली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुराव्यासहीत त्यांचे वक्तव्य कसे फिरवले गेले हे दाखवले. छत्रपती शिवाजी महाराज किंवा तेथील महान व्यक्तींच्या पुतळ्याबाबतही असे करणे निंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य फिरण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, सीएमओही ही घटना घडल्यानंतर मोठे निवेदन काढते. मग त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेतेही बोलतात. महाराजांच्या पुतळ्यावर सत्तापक्षाचे एक आमदार बूट घालून चढतात. मग तो महाराजांचा अपमान नाही ? महाराजांचा अपमान काय निवडक आहे का? याबाबत मात्र हे मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि राऊतांचे काही वक्तव्य नाही. असा निवडक अपमान होऊ शकत नाही आणि तुम्ही तो निवडूही शकत नाही. महाराजांचा अपमान कोणीही केला, असला तरी आम्ही निषेध करुच.

शिवसेना नेते आणि कार्यकर्ते यांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून देण्यासाठी शिवभोजन योजना आहे. महाराजांच्या नावे योजना आणि त्यात भ्रष्टाचार, हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती मोठा अपमान अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

फार काळ संसदेचे, अनेक राज्यांचे अधिवेशन चालू शकते, पण महाराष्ट्रातील या सरकारची अधिवेशन घेण्याची मानसिकताच नाही. लोकशाही या सरकारने बंद केली आहे. या सरकारमध्ये रोकशाही आणि भोगशाही चालू आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेला कारभार राज्याच्या जनतेने कधीही पाहिला नाही. स्थगिती, खंडणी, वसुली, लूट, भ्रष्टाचार याचे जेवढे प्रकार सरकारच्या काळात पाहायला मिळत आहेत, तेवढे कधीच पाहायला मिळाले नसल्याचे म्हणत फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

विरोधकांनी बोलू नये, त्यांची तोंडे बंद करण्यासाठी एकेक वर्षासाठी आमदारांना निलंबित करणे राज्याच्या इतिहासात अक्षरश: काळिमा फासण्याचे काम सरकारच्या दबावाखाली होत आहे. ज्या घटना घडल्या नाहीत, त्यांची कारणे सांगून आमच्या आमदारांना निलंबित केले आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्याचे एवढेच कारण आहे की आपल्या स्वत:च्या आमदारांवर सरकारला विश्वास नाही, सरकार कधीही अडचणीत येऊ शकते, असा ठाम विश्वास यांच्या मनात आहे. म्हणून मुद्दाम आमची संख्या कमी करण्याचा कार्यक्रम सरकारने केला असल्याचे देखील फडणवीस म्हणाले.