टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे, जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुखाला अटक


पुणे – टीईटी पेपरफुटी प्रकरणी सध्या राज्यात अटकेचे सत्र सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे पोलिसांकडून टीईटी पेपरफुटी प्रकरणी आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांकडून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच बंगळुरूमधून जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुखालाही अटक करण्यात आली आहे.

जेव्हापासून जीए टेक्नॉलॉजीला परीक्षा विभागाचे कंत्राट मिळाले तेव्हापासून म्हणजे, 2017 पासुन टीईटीच्या परिक्षेतील हे गैरप्रकार सुरु होते, असे आता स्पष्ट झाले आहे. याच अनुषंगाने पुणे पोलिसांनी आणखी दोन महत्वाच्या व्यक्तींना या प्रकरणात अटक केली आहे. यातील पहिली अटक जीए टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख अश्विन कुमार याची आहे. अश्विन कुमारला पुणे पोलीसांनी बंगळुरूमधून अटक केली आहे. तर दुसरी महत्त्वाची अटक महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांची आहे. संगमनेर तालुक्यातील त्यांच्या मुळ गावातून डेरेंना पोलिसांनी अटक केली आहे.

अश्विन कुमार हा आधीपासून या प्रकरणात अटकेत असलेल्या प्रितेश देशमुखचा वरिष्ठ आहे. तर सुखदेव डेरे हे 2017 साली जेव्हा जीए टेक्नॉलॉजीला शिक्षण परिषदेकडून परीक्षा घेण्याचे कंत्राट मिळाले होते, तेव्हा शिक्षण परिषदेचे आयुक्त होते. या सगळ्यांनी मिळून 2018 साली झालेल्या टीईटी परीक्षेतही अशाचप्रकारे अपात्र उमेदवारांना पात्र ठरवल्याचे समोर आले आहे. जीए टेक्नॉलॉजी या कंपनीकडे 2017 ते 2020 या काळात शिक्षण परिषदेचे परीक्षा घेण्याचे कंत्राट होते. मधल्या काळात सुखदेव डेरे हे सेवानिवृत्त झाले आहेत.