महाराष्ट्र एकीकरण समितीवरील बंदीची चर्चा; कर्नाटक सरकारला शिवसेनेचे थेट आव्हान


मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रकार बंगळुरूमध्ये घडल्यानंतर बेळगावसहीत सीमा भागांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलन केले. पण महाराष्ट्र एकीकरण समितीवर या आंदोलनानंतर बंदी घालण्यासंदर्भात कर्नाटक सरकार विचार करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. असे असतानाच शिवसेनेने यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी लोकांचा आवाज दाबून हुकूमशाहीची बिजे रोवली जात असतील, तर महाराष्ट्र गप्प बसणार नसल्याचे सांगतानाच कर्नाटक सरकारने बंदी घालून दाखवावीच, असे थेट आव्हान दिले आहे.

एक पक्षीय हुकूमशाही दिल्लीच्या संसदेमध्ये किंवा राष्ट्रीय स्तरावर सुरु असल्यामुळे आमचे १२ खासदारही निलंबित केले आहेत. ती लढाई आम्ही लढत, असल्याचे राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. त्यांनी पुढे बोलताना, भाजपशासित राज्यामध्येसुद्धा अशाप्रकारे लोकांचा आवाज दाबून हुकूमशाहीची बिजे रोवली जाणार असेल, तर महाराष्ट्र गप्प बसणार नसल्याचेही राऊत म्हणाले.

महाराष्ट्र एकीकरण समिती ही राजकीय संघटना नाही. सीमा भागातील मराठी बांधवांचा आवाज, त्यांचा संघर्ष आणि त्यांचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र एकीकरण समिती मागील ७० वर्षांपासून करत आहे. त्यासाठी त्यांनी रक्त सांडले आहे. बलिदाने दिलेली आहेत. तिथे २० लाखांच्या वर मराठी बांधव आहेत. ही सामन्य ताकद नसल्याचेही राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीबद्दल बोलताना सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बंगळुरुमध्ये वारंवार विटंबना होत आहे. त्याच्याविषयी देशभरामध्ये संताप आहे. बेळगावमधील सीमाभागातील लोकांनी आंदोलन करुन संताप व्यक्त केला. लोकशाही मार्गाने त्यांनी आंदोलन केले. कायदा हातात घेतला असेल, तर कर्नाटक सरकारने कारवाई करावी. पण महाराष्ट्र एकीकरण समितीच्या २०० हून अधिक कार्यकर्त्यांना मागील दोन दिवसांपासून बेकायदेशीरपणे अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर पोलीस बेदम लाठीमार करत आहेत, डोकी फोडत आहेत, त्यावर महाराष्ट्रातील भाजपचे संवेदनशील नेते काय करत आहेत?, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. एकीकरण समितीवर बंदीची भाषा ही बोलण्यापर्यंत ठीक आहे. पण त्यांनी बंदी घालून दाखवावी, असे थेट आव्हानच राऊत यांनी कर्नाटक सरकारला दिले आहे.

यासंदर्भातील केंद्राची भूमिका ढोंगी आणि दुटप्पीपणाची आहे. वाराणसीला जाऊन हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी, पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ दिला. पण त्या छत्रपतींचा अपमान भाजपशासित राज्यात झाला, त्याबद्दल एकही केंद्रीय मंत्री बोलत नाही, हे ढोंग असल्याचेही राऊत म्हणाले आहेत.