म्हाडा पेपरफुटी प्रकरणी भाजयुमोच्या नेत्याला अटक


पुणे – बीड जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपर फुटी झाल्याच्या प्रकरणी यापूर्वीच कारवाई झालेली असतानाच आता पोलिसांनी भारतीय जनता युवा मोर्चा पाटोदा माजी अध्यक्ष संजय सानप याला अटक केली आहे. पुण्यात सायबर पोलिसांकडून संजय सानप यांची चौकशी चालू होती. त्यावेळी त्याचा या पेपरफुटी प्रकरणांमध्ये सहभाग आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. 23 डिसेंबरपर्यंत संजय सानपला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी आतापर्यंत आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणात 18 जणांना ताब्यात घेतले आहे. संजय सानप यांचे मूळ गाव असलेल्या वडझरी परिसरातील अनेक मुलांना त्याने नोकरीला लावले असल्याचेही बोलले जात आहे. म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणात इतर परीक्षांमधील गैरप्रकार समोर येत आहेत. हा तपास म्हाडा पेपरफुटीवरून सुरू झाला, त्यातून इतर परीक्षांचे घोटाळे समोर आल्यामुळे भविष्यात आणखी घोटाळे बाहेर येऊ शकतात आणि अटकही होऊ शकते. ही फक्त सुरुवात असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी म्हटले होते.

पुणे सायबर पोलीस ठाण्याचे 70 कर्मचारी आरोग्य पेपर फुटी, म्हाडा पेपर फुटी आणि आता टीईटी परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराचा तपास करत आहेत. यामध्ये वीस अधिकारी आहेत. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली आहे, अशांनी पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. आता या पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांसोबत युनिट वन आणि युनिट फोरचे अधिकारी देखील तपास करणार आहेत. यासोबतच आरोपींनी टीईटीच्या परीक्षेचा पेपर देण्याच्या आमिषाने अनेकांकडून पैसे घेतले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी समोर यावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.