नववर्षाच्या स्वागतासाठी दुबईत पर्यटकांची झुंबड

नवीन वर्ष आत्ता उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. जगभरातील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ दुबई नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेच पण पर्यटकांची सुद्धा दुबई मध्ये झुंबड उडाली असून जवळजवळ सर्व हॉटेल्स आत्ताच बुक झाली असल्याचे समजते. दुबई हॉटेल बुकिंग पोर्टल डेटावरून डाऊन टाउन भागात हॉटेल ऑक्युपन्सी ९९ टक्क्यांवर गेली आहे. नव वर्षाच्या स्वागतासाठी दुबई मध्ये बुर्ज खलिफा आणि अन्य लोकप्रिय ठिकाणी केली जाणारी आतषबाजी हे मोठे आकर्षण आहे. आतषबाजी दिसू शकेल अश्या ठिकाणची हॉटेल्स त्यामुळे बुक झाली असून एका रात्रीसाठी खोलीचा दर २.७० लाख रुपयांवर गेला असल्याचे सांगितले जात आहे.

पाम जुमेरा भागात समुद्र काठी असलेल्या व्हीलांसाठी भाडे १६ लाखांवर गेले असल्याचे सांगितले जात आहे. नवीन वर्ष महोत्सवासाठी युएईच्या रास अल खेमा अमिराती मध्ये आतषबाजीचे पूर्वीचे गिनीज बुक रेकॉर्ड तोडण्याची तयारी पूर्ण झाली असून या बीचवर ४.७ किमी परिसरात १२ मिनिटे अपूर्व आतषबाजी केली जाणार आहे. येथेच पंजाबी गायक गुरु रंधवा यांचा लाईव्ह शो हे मुख्य आकर्षण आहे.

दुबई मध्ये कोविड १९ लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे त्यामुळे लोकांमध्ये करोनाची भीती कमी झाली आहे. गेल्या तीन महिन्यात ६३ लाखाहून अधिक पर्यटकांनी दुबईला भेट दिली आहे तर नवीन वर्षासाठी येत असलेल्या पर्यटकांची संख्या रोज १ लाख ६० हजाराहून अधिक आहे. याच काळात दुबईमध्ये शॉपिंग फेस्टिव्हल होतो. तेथे १ हजार विविध ब्रांड ४ हजारापेक्षा अधिक आउटलेट मध्ये विकले जात आहेत. मुख्य मॉल मध्ये ९० टक्के सवलतीचे सेल सुरु आहेत आणि त्यालाही पर्यटकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे समजते.