न्यूयॉर्कवासीय उंदरांच्या उपद्रवाने हैराण
करोनाच्या विळख्यात अडकलेल्या अमेरिकेत न्यूयॉर्कवासीय आता उंदरांमुळे हैराण झाले असून शहरातील किमान २० लाखाहून अधिक संखेने असलेले उंदीर नष्ट करण्यासाठी व्यापक अभियान राबविले जात असल्याचे समजते. रस्ते, नद्या, इमारती, पार्क, रेस्टॉरंट, मेट्रो स्टेशन, दुकाने, घरात या उंदरांनी उच्छाद मांडला आहे. २०१९ च्या तुलनेत शहरात उंदरांची समस्या ४० टक्के वाढली असल्याचे सांगितले जात आहे. यामागे साफसफाईचा अभाव व कचरा वेळेवर न उचलला जाणे अशी कारणे दिली जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार करोना काळात रेस्टॉरंट बंद राहिली त्यामुळे उंदरांना अन्न मिळेना. परिणामी ते अन्नाच्या शोधात उघड्यावर आले आहेत. उंदीर पकडण्याचे सर्व उपाय वाया गेल्यावर आता छोट्या तोंडाच्या शिकारी कुत्र्यांचा वापर केला जात आहे. अमेरिकेत १९९५ पासून उंदरांच्या शिकारीसाठी कुत्र्यांचा वापर केला जात आहे. मात्र या वर्षी या कुत्र्यांना ही उंदीर पकडण्यात फारसे यश मिळताना दिसत नाही असे समजते. शहराचे मेयर एरिक अॅडम्स म्हणाले उंदरांच्या समस्येने हैराण झालो आहोत. अनेक कंपन्या उंदरांचा नायनाट करणारी विविध मशीन्स दाखवत आहेत पण उंदरांवर काबू मिळविणे अवघड होते आहे.