द.आफ्रिकेत ओमिक्रॉनचा जोर ओसरला
करोनाचे नवे व्हेरीयंट ओमिक्रॉन प्रथम आढळलेल्या द.आफ्रिका देशातून एक दिलासादायक बातमी आली आहे. देशात ओमिक्रॉन कमजोर पडल्याचे दिसत असून परिस्थिती वेगाने सुधारत असल्याचे नॅशनल इन्स्टीटयूट फॉर कम्युनिकेबल डिसीजच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. गेल्या २३ तासात ८५१५ लोकांची करोना चाचणी रिपोर्ट पॉझीटिव्ह आली आहे. सोमवारी हीच संख्या १३९९२ होती.
डेली मेलच्या रिपोर्ट नुसार ओमिक्रॉन आउटब्रेक मुळे येत असलेल्या केसेस मध्ये ४० टक्के घट झाली असून हॉस्पिटल मध्ये भरती करावे लागणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सोमवारी केवळ ३२३ रुग्णांना हॉस्पिटल मध्ये भरती करावे लागल्याचे समजते. ओमिक्रॉनचा प्रकोप कमी झाल्याचे हे लक्षण मानले जात आहे. द. आफ्रिकेत ओमिक्रॉन सर्वप्रथम सापडला होता पण तेव्हाच तेथील डॉक्टर्सनी हे व्हेरीयंट डेल्टा इतके प्रभावी नसल्याचे सांगितले होते. मात्र यावर वाद निर्माण झाला होता.
ओमिक्रॉन खरोखरच कमी घातक आहे कि आफ्रिकेतील लोकांची इंम्युनीटी अधिक चांगली आहे यावर वाद निर्माण झाला होता कारण महिनाभर अगोदरच येथील जनतेने डेल्टा व्हेरीयंटचा सामना केला होता. यावर आफ्रिकेने ओमिक्रॉन वर उगीचच वाढवून चढवून माहिती दिली जात असल्याचा आरोप ब्रिटीश संशोधकांवर केला होता. कारण या संशोधकांनी ओमिक्रॉनचा प्रसार वेग पाहता रोज ६ हजार मृत्यू होतील असा अंदाज व्यक्त केला होता.