जया बच्चन यांचा मोदी सरकारला शाप

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिची पनामा कागदपत्र प्रकरणी ईडी कडून सात तास चौकशी सुरु असतानाच राज्यसभेत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी मोदी सरकारसाठी शापवाणी उच्चारली आहे. संसदेत निलंबित खासदार प्रश्नावरून जया बच्चन यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली आणि मोदी सरकारला शाप दिला. त्या म्हणाल्या तुमची वर्तणूक अशीच राहिली तर तुमचे वाईट दिवस लवकरच येतील असा माझा शाप आहे.

राज्यसभेत अमली पदार्थ संदर्भात मांडलेल्या विधेयकावर चर्चा सुरु होती. दिग्विजय यांनी या संदर्भात सरकारवर गंभीर आरोप केले.त्यानंतर बोलण्यासाठी जया यांना वेळ दिला गेला होता. त्यावेळी त्यांनी सरकारवर तोफ डागली. या सरकारकडून न्यायाची अपेक्षा नाही असे सांगून त्यांनी १२ निलंबित खासदारांच्या बद्दल कुणालाच आस्था नाही असे सांगितले. त्यावर त्यांना अमली पदार्थ विधेयकाबाबत तुमचे म्हणणे मांडा अशी सूचना केली गेली तेव्हा त्यांनी चर्चेसाठी खूप मुद्दे आहेत पण वेळ दिला जात नाही असा आरोप केला आणि असेच वागत राहिलात तर लवकरच तुम्हाला वाईट दिवस येतील असा शाप दिला.

यावेळी जया बच्चन यांनी निलंबित खासदारांच्या विषयी बोलताना आम्हाला बोलू देणार नसाल तर आम्हीही बाहेर जातो, अन्यथा आमचा गळा घोटा असेही शब्द उच्चारले. तुम्ही ओरडून बोलत होतात ते दिवस आम्ही विसरणार नाही असेही त्या म्हणाल्या.