ओमिक्रॉन साठी केंद्र सरकारची पूर्ण तयारी
जगाच्या ९० पेक्षा अधिक देशात गेलेल्या आणि भारतात सुद्धा दस्तक दिलेल्या करोनाच्या नव्या व्हेरीयंटचा म्हणजे ओमिक्रॉनचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने पूर्ण तयारी केली आहे अशी माहिती केंद्रीय स्वास्थ्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी राज्यसभेत दिली. ते म्हणाले ओमिक्रॉनचा उपद्रव लक्षात घेऊन केंद्राने लस, हॉस्पिटल्स मध्ये ऑक्सिजन व आवश्यक सर्व औषधे यांचा पुरवठा आणि साठवण केली आहे.
मांडविया म्हणाले, देशात ८८ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे तर ५८ टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. देशात लसीकरणाचा वेग वाढविला गेला आहे. येथे दोन महिन्यात दर महिना ४५ कोटी डोस उत्पादन करण्यासाठी कंपन्या सज्ज आहेत. सध्या दरमहा ३१ कोटी डोस उत्पादित केले जात आहेत. करोनासाठी आवश्यक औषधे, ऑक्सिजनचा बफर स्टॉक राज्यांना पोहोचविला गेला आहे.
रविवारी देशात ओमिक्रॉनच्या १४ नव्या केसेस आढळल्या असून मुंबई मध्ये चार तर पुणे पिंपरी मध्ये प्रत्येकी एक केस आढळली आहे. ओमिक्रॉन संक्रमितांची आत्तापर्यंतची एकूण संख्या १६६ वर गेली आहे. देशात करोनाच्या संक्रमितांची आत्तापर्यंतची संख्या ३ कोटी ४७ लाख आहे. त्यातील ८२२६७ लोकांवर उपचार सुरु आहेत. ३ कोटी ४१ लाख रुग्ण बरे झाले आहेत आणि करोना बळींची संख्या ४ लाख ७७ हजार आहे. आत्तापर्यंत लसीचे १ अब्ज ३७ कोटी डोस दिले गेले आहेत. ओमिक्रॉन वाढत असल्याचे दिसत असले तरी करोना संक्रमित संख्या कमी होते आहे असेही त्यांनी सांगितले.