भारतीय वंशाच्या ‘या’ व्यक्तीची यामुळे होत आहे एलॉन मस्कसोबत तुलना


नवी दिल्ली – परदेशात महत्त्वाच्या अशा कंपन्यांमध्ये भारतीय वंशाचे अनेक लोक मुख्य कार्यकारी अधिकारी पदी आहेत. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवालही यामुळेच काही दिवसांपूर्वी खूप चर्चेत होते. आता आणखी एक भारतीय वंशाची व्यक्ती चर्चेत आली आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतीय वंशाच्या या व्यक्तीला बॅटरी बनवणाऱ्या एका स्टार्टअप कंपनीने वार्षिक १७,५०० कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव जगदीप सिंग असे असून तो त्याच्या सॅलरी पॅकेजमुळे जगभरात चर्चेत आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे पॅकेज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलॉन मस्कशी स्पर्धा करते.

जगदीप सिंगच्या सॅलरी पॅकेजबद्दलची माहिती समोर आल्यानंतर जगातील आघाडीच्या कंपन्यांचे सीईओही आश्चर्यचकित झाले आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून जगदीप सिंग यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केले आहे. त्याचबरोबर कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एमबीए आणि युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले आहे. त्याला क्वांटमस्केप कॉर्पोरेशनने २.३ बिलियन डॉलरचे पॅकेज दिले आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, क्वांटमस्केप कॉर्पचे जगदीप सिंग संस्थापक असून यापूर्वी त्यांनी २००१ ते २००९ दरम्यान इन्फिनेराचे सीईओ म्हणून काम केले होते. ते २००१ पूर्वी लाइटरा नेटवर्क्स, एअरसॉफ्ट सारख्या कंपन्यांचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांनी २०१० मध्ये क्वांटमस्केप कॉर्पची पायाभरणी केली.

जगदीप सिंग यांच्या कंपनीत फोक्सवॅगन आणि बिल गेट्सच्या व्हेंचर फंडांनीही गुंतवणूक केली आहे. सध्या कंपनीचे मूल्य ५० अब्ज डॉलर आहे. पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानावर ही कंपनी भर देत आहे. यासह, इलेक्ट्रिक वाहने जगभरात स्वीकारली जाऊ शकतात. जगदीप सिंग यांची कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मात्यांद्वारे लिथियम-आयन बॅटरीला अधिक सुरक्षित आणि स्वस्त पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर देत आहे.

दरम्यान, कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांना मोठमोठे पगाराचे पॅकेज देण्याची नवी परंपरा अलीकडच्या काळात पाहायला मिळत आहे. स्टार्टअपच्या यशानंतर कंपन्या वेगाने वाढत आहेत आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाखो डॉलर्सचे पगार पॅकेज देत आहेत. टेस्लाच्या यशामुळे कंपनीचे सीईओ एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आले आहेत.