जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती यंदाच्या वर्षी भरणार एवढा आयकर


यंदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या एलन मस्क यांची यंदाच्या ‘टाईम्स पर्सन ऑफ द इयर २०२१’ म्हणून जगप्रसिद्ध टाइम या नियतकालिकेने निवड केली आहे. ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे सर्वोसर्वा एलन मस्क यांची ही निवड झाल्यानंतर नक्की संपत्ती किती तसेच ते दरवर्षी कर म्हणून किती रक्कम भरतात यासंदर्भातील माहिती सर्च करण्यास सुरुवात झाली आहे. मस्क यांच्या संपत्तीबरोबरच त्यांच्याकडून या संपत्तीसाठी देण्यात येणाऱ्या कराच्या आकडेवारीबद्दलही नेटकऱ्यांना बरीच उत्सुकता आहे. त्यामुळेच मस्क यांनी स्वत:च ते किती कर भरतात याची आकडेवारी ट्विटरवरुन शेअर केली आहे.

आपण किती कर भरतो यासंदर्भातील आकडेवारी मस्क यांनी जाहीर करण्यामागील प्रमुख कारण ठरले अमेरिकेतील डेमोक्रॅटीक पक्षाच्या सिनेटर अलिझाबेट वॉर्नर यांनी ट्विटरवरुन केलेले वक्तव्य. ‘टाईम्स पर्सन ऑफ द इयर २०२१’ म्हणून मस्क यांना निवडण्यात आल्यानंतर वॉर्नर यांनी मस्क यांच्यावर खोचक शब्दात टीका केली होती. मस्क यांनी वेळत कर भरला पाहिजे आणि इतरांवरील ओझे हलके केले पाहिजे, असे ट्विटरवरुन म्हटले होते.


मस्क यांनी या टीकेवर उत्तर देताना कोणत्याही अमेरिकन व्यक्तीने आज पर्यंतच्या इतिहासात दिला नसेल एवढी रक्कम आपण यंदाच्या वर्षी कर म्हणून भरणार असल्याचे म्हटले होते. मस्क हे सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांची टेस्ला कंपनीचे मूल्य एक ट्रिलीयन डॉलर्स (सुमारे ७६ लाख कोटी रुपये) एवढे आहे. कंपनीचे मूल्य आता फोर्ड मोटर आणि जनरल मोटर्सच्या एकत्रित मूल्यापेक्षा जास्त झाले आहे. मस्क यांनी मागील काही आठवड्यांमध्ये कंपनीमधील १४ बिलीयन अमेरिकन डॉलर्सचे शेअर्स विकले आहेत. मस्क यांनी मी किती कर भरणार याबद्दल जे लोक विचार करत आहेत, त्यांना सांगू इच्छितो की यंदाच्या वर्षी मी अकराशे कोटी डॉलर्सहून अधिक कर भरणार असल्याचे ट्विट केले आहे.