McDonald’s च्या माजी CEO चे ‘त्या’ अश्लील व्हिडीओबाबतचे धक्कादायक सत्य जगासमोर


१०५ दशलक्ष डॉलर्सची रक्कम मॅकडोनाल्ड्सचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह इस्टरब्रूक यांनी कंपनीला परत केली आहे. रोख आणि स्टॉक्स म्हणजेच शेअर्सच्या माध्यमातून स्टीव्ह यांनी ही रक्कम कंपनीला परत केली आहे. स्टीव्ह यांनी ही रक्कम जगातील सर्वात आघाडीच्या फास्ट फूड कंपन्यांपैकी एक असणाऱ्या मॅकडोनाल्ड्सने दाखल केलेल्या याचिकेनंतर तडजोड म्हणून परत केली आहे. कंपनीमधील कर्मचाऱ्यांशी स्टीव्ह यांनी पदावर असताना खासगी संबंध ठेऊन त्याबद्दलची माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. कंपनीने स्टीव्ह यांना या प्रकरणी निलंबित केले होते. स्टीव्ह यांनी कंपनीचे नियम मोडून परस्पर संमतीने कंपनीच्या कर्मचाऱ्यासोबतच नाते ठेवल्याचे उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.

५२ वर्षीय स्टीव्ह इस्टरब्रूक हे ब्रिटीश उद्योग व्यवस्थापक म्हणून कॉर्परेट जगतामधील नावाजलेले नाव आहे. इंग्लंडमधील वॉटफोर्टमध्ये त्यांचा जन्म झाला. डर्हम विद्यापीठामधून नॅचरल सायन्स विषयामध्ये त्यांनी पदवी संपादन केली. त्यानंतर ते १९९३ सालापासून मॅकडोनाल्ड्ससोबत काम करु लागले. २००६ साली त्यांच्याकडे मॅकडोनाल्ड्स युकेचा कारभार सोपवण्यात आला आणि त्यांना मॅकडोनाल्ड्स युरोपचे अध्यक्ष हे पद देण्यात आले. २००७ साली त्यांना कंपनीचा स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क, नॉर्व आणि आयर्लंडमधील उद्योग संभाळण्यास सांगितले. त्याचबरोबर त्यांना उत्तर युरोपमधील कंपनीच्या व्यवहारांचे प्रमुखपदही देण्यात आले होते.

स्टीव्ह यांनी २०११ साली मॅकडोनाल्ड्स कंपनीला रामराम केला आणि ते पिझ्झा एक्सप्रेस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. त्यानंतर २०१३ साली स्टीव्ह यांनी पुन्हा मॅकडोनाल्ड्स कंपनी जॉइन केली. ते वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ब्रॅण्डींगसंदर्भातील मुख्य अधिकारी पदावर रुजू झाले. त्यांच्यावर कंपनीने निलंबनाची कारवाई करेपर्यंत ते पदावर कार्यरत होते. त्यांचे एका महिला कर्मचाऱ्यासोबत खासगी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना पदावरुन बडतर्फ करण्यात आले होते.

दरम्यान स्टीव्ह यांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये मॅकडोनाल्ड्स आणि कंपनीच्या कार्यकारी मंडळाने त्यांच्या ग्राहकांचा आणि लोकांचा आधी विचार करण्याचे धोरण स्वीकारत योग्य निर्णय घेतला आहे. सीईओ म्हणून मी काही जबाबदारी पार पाडण्यात आणि कंपनीची मूल्य जपण्यामध्ये कमी पडलो. एक नेतृत्व करणारा अधिकारी म्हणून मी अपयशी ठरलो. मी माझ्या माजी सहकाऱ्यांची, बोर्डाची आणि कंपनी फ्रेन्चायझी मालकांची तसेच पुरवठादारांची माफी मागतो, असे म्हटले आहे.

स्टीव्ह यांच्याविरोधात मॅकडोनाल्ड्सने दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात स्पष्टीकरण देताना चौकशीदरम्यान स्टीव्ह यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यासोबत नाते असल्याचे मान्य केले. पण आपण कधीच कंपनीच्या कर्मचाऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवलेले नसल्याचे स्टीव्ह यांनी म्हटले.

स्टीव्ह मॅकडोनाल्ड्सने केलेल्या तपासामध्ये दोषी आढळून आले असून त्यांनी कंपनीच्या नियमांचा भंग केल्याचे उघड झाले. कंपनीमधील कर्मचाऱ्यासोबतचं आपले नाते स्टीव्ह यांनी लपवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. स्टीव्ह यांच्याविरोधात कंपनीच्या बोर्डाने खोटारडेपणा, फसवणूक आणि कंपनीच्या नैतिक मुल्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप निश्चित करत कारवाई केली आहे. या प्रकरणामध्ये स्टीव्ह यांना कंपनीने निलंबित करुन प्रकरण बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबत द न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार स्टीव्ह यांना निलंबित करताना ४० मिलियन अमेरिकन डॉलर्सची रक्कम देण्यास बोर्डाने मान्यता दिली होती.

पण प्रकरण येथेच संपले नाही, मॅकडोनाल्ड्सच्या कार्यालयामध्ये जुलै २०२० साली एक निनावी पत्र आले. यामध्ये स्टीव्ह हे सीईओ पदावर असताना त्यांचे एका कर्मचाऱ्याशी शारीरिक संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. मॅकडोनाल्ड्सने या पत्राच्या आधारे अंतर्गत चौकशी करण्याचा निर्णय घेतला. या चौकशीदरम्यान पॉर्नोग्राफीक पुराव्यांच्या आधारे स्टीव्ह यांचे कंपनीमधील तीन कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध असल्याचे उघड झाले. स्टीव्ह यांच्याविरोधात कंपनीने दाखल केलेल्या याचिकेमध्ये आमच्याकडे पुरावा म्हणून अनेक नग्नावस्थेतील, अर्धनग्नावस्थेतील तसेच अश्लील फोटो आणि व्हिडीओ असल्याचे सांगितले. या फोटो आणि व्हिडीओंमधील महिलांमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्याही समावेश असल्याचेही कंपनीने म्हटले.

२०१८ च्या शेवटी आणि २०१९ च्या सुरुवातीला फोटो आणि इतर पुराव्यांवरुन हे सर्व व्हिडीओ चित्रित करण्यात आल्याचे स्पष्ट होत असल्याचे कंपनीने याचिकेत म्हटले होते. या पुराव्यांवरुन स्टीव्ह यांनी यापूर्वी कंपनीने केलेल्या चौकशीमध्ये खोटी माहिती दिल्याचेही उघडे झाल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले. या महिला कर्मचाऱ्यांपैकी एकीसोबत पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर स्टीव्ह यांनी तिला मोठ्या प्रमाणात मर्यादित स्टॉक्सपैकी काही वाटा दिल्याचे पुरावेही कंपनीच्या हाती लागले. त्यानंतरच कंपनीने स्टीव्ह यांच्याविरोधात याचिका दाखल केली.

स्टीव्ह यांचा खरा चेहरा नंतरच्या तपासामध्ये समोर आल्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात कोणतीही गंभीर कारवाई न करता मोठी रक्कम देत प्रकरण निलंबनानंतर बंद केले होते. पण आता त्या तपासामध्ये स्टीव्ह यांनी खरी माहिती लपवली असल्याचे उघड होत असल्यामुळे आम्ही स्टीव्हविरोधात याचिका दाखल करत असल्याचे कंपनीने याचिकेत म्हटले होते. ही याचिका मान्य करण्यात आली असून कंपनीच्या बाजूने निकाल लागल्यामुळे स्टीव्ह यांना आता १०५ दशलक्ष (साडेदहा कोटी) डॉलर्सची रक्कम परत करावी लागली आहे.