लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘बजरंगी भाईजान’चा सिक्वेल


आपल्या फिल्मी कारकिर्दीत बॉलिवूड अभिनेता सलमान खानने अनेक यशस्वी चित्रपटात काम केले आहे. सलमानच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीतील ‘बजरंगी भाईजान’ हा सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. दरम्यान लवकरच ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. विशेष म्हणजे सलमान खानने स्वत: याबाबतचे संकेत दिले आहेत.

देशभरातील चित्रपटगृहात ‘RRR’ हा चित्रपट येत्या ७ जानेवारीला रिलीज होणार आहे. यानिमित्ताने मुंबईत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सलमान खान, करण जोहर, आलिया भट्ट, ज्युनियर एनटीआर, रामचरण आणि एस. एस. राजामौली यावेळी उपस्थित होते. सलमान खानने या कार्यक्रमात ‘बजरंगी भाईजान’चा दुसरा भाग येणार असल्याची घोषणा केली.

सलमान यावेळी म्हणाला, एस. एस. राजामौली यांचे वडील आणि प्रसिद्ध लेखक के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाची कथा लिहिली. हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या कथेपैकी एक आहे. दरम्यान विजयेंद्र प्रसाद यांनी नुकतेच ‘बजरंगी भाईजान’च्या सिक्वेलच्या कथा लिहिण्याचे काम पूर्ण केले आहे. करण जोहरने यावेळी सलमानला विचारले, म्हणजे या ठिकाणी ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करतोस का? त्यावर सलमान ‘हो’ असे उत्तर दिले.