ही २७ वर्षीय तरुणी इन्स्टाग्राम आणि टीक-टॉकवर एक्सेल टिप्स देऊन कमवते दरमहा १ कोटी


मायक्रोसॉफ्ट एक्सेल किंवा त्याबाबतीतील गुगल शीट्स समजणे खूपच गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे अनेकदा काम करताना अडचणी येतात. यामुळे एखाद्या एक्स्पर्टची मदत घेऊन अडचणी सोडवल्या जातात. पण एखादा एक्स्पर्ट प्रत्येक वेळी जागेवर उपलब्ध असेलच असे नाही. अनेकदा एखादी अडचण आली, तर संबंधित व्यक्ती येईपर्यंत ताटकळत राहावे लागते. कॅट नॉर्टन ही तरुणी या सर्व समस्यांचा अभ्यास करून या एक्सेल संदर्भातील टिप्स आणि युक्त्या ऑनलाइन माध्यमातून शिकवते. तिचे इन्स्टाग्राम आणि टीक-टॉकवर लाखो फॉलोअर्स आहेत. एक्सेल टिप्स देणारा एखादा व्हिडिओ तिने शेअर केला की त्यावर लाखो लोकांच्या उड्या पडतात. एका वर्षाच्या आत इन्स्टाग्राम आणि टीक-टॉकवर तिचे १ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. एक्सेल आणि गुगल स्प्रेडशीट्सबाबत व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या शब्दात शिकता येते.

मायक्रोसॉफ्ट एक्सेल ऑनलाइन शिकवण्यासाठी २७ वर्षीय कॅट नॉर्टनने तिची कॉर्पोरेट नोकरी सोडली. तिचे जीवन या निर्णयामुळे बदलले. द एक्सप्रेसनुसार, नोव्हेंबर २०२० मध्ये इन्स्टाग्रामवर @miss.excel म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॉर्टनने तिचा ऑनलाइन शिकवण्याचा व्यवसाय सुरू केला. तिला यात एक वर्षापूर्वी यश मिळू लागले आणि महिन्याकाठी आता ती कोट्यावधी रुपये कमवते.

मिस एक्सेल नावाने देखील कॅट नॉर्टन प्रसिद्ध झाली आहे. ती आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण-वेळ ट्रेनिंग देते. केवळ मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि Google शीट्सवरच नव्हे तर इतर मायक्रोसॉफ्ट आणि ऑनलाइन उत्पादनांबाबतही माहिती देते. एप्रिल २०२१ मध्ये नॉर्टन यांची पहिली सहा आकडी कमाई झाली. तिला तिच्या या कामासाठी प्रियकराने मोलाची साथ दिली. त्याने नोकरी सोडत नॉर्टनला मदत केली. आता नॉर्टनचे महिना सात आकडी कमाई करण्याचे ध्येय आहे.