माझ्या घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी चहा, कुकीजसह तयार, नवाब मलिकांचे ट्वीट


मुंबई – काही ऑफिशल पाहुणे आज सकाळी माझ्या घरी अचानक येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटले आहे. मी चहा बिस्कीट देऊन मोठ्या मनाने या पाहुण्यांचे आदरातिथ्य करेन. त्यांना योग्य पत्ता हवा असेल, तर मला फोन करावा, असेही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान नवाब मलिक यांना पुन्हा एकदा धमकीचे पत्र मिळाले आहे. त्यांना या पत्रात जीवे मारण्यासह कुटुंबातील महिलांवर बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचे पत्र लिहिणाऱ्याने स्वतःला नौदलात कर्नल असल्याचे सांगितले आहे. मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप केल्यामुळे आपण पत्र लिहित असल्याचा उल्लेख देखील या पत्रात करण्यात आला आहे. समीर वानखेडे यांची माफी मागितली नाही तर मलिक यांच्या घरावर हल्ला करणार असल्याचा इशारा या पत्रातून दिला गेला आहे.


आपण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली होती. अभिजित बनसोडे नावाच्या व्यक्तीने कफ परेड मुंबई येथून हे पत्र लिहिल्याचे म्हटले होते. या संपूर्ण प्रकरणावर बोलताना नवाब मलिक यांनी म्हटले होते की, अशा धमक्यांना आपण घाबरत नाही. मागे देखील अशाप्रकारच्या धमक्या मला फोनवरून आल्या होत्या. परंतु यातील एकाही धमकीला आपण घाबरलेलो नाही आणि घाबरणार नाही.