पुष्पा चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान अल्लू अर्जुनने चक्क मराठीत साधला संवाद


दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ या चित्रपटाचा पहिला भाग नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दमदार कमाई करताना दिसत आहे. नुकतीच अल्लू अर्जुनने या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. अल्लू अर्जुनने यावेळी चक्क मराठीत संवाद साधला. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

१७ डिसेंबरला अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना याचा पुष्पा हा चित्रपट रिलीज झाला. मुंबईत एका प्रमोशन कार्यक्रमाचे आयोजन हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी करण्यात आले होते. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदनासह इतर कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी अल्लू अर्जुनने चक्क मराठीत संवाद साधला.

अल्लू अर्जुन यावेळी जेव्हा उपस्थितांशी संवाद साधायला उठला, तेव्हा तो म्हणाला, सगळ्यांना माझा नमस्कार…’ याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ Watch Bollywood नावाच्या एका युट्यूब चॅनलने शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे.

अनेक भाषांमध्ये ‘सुपरस्टार’ अल्लु अर्जुन याचा ‘पुष्पा’ चित्रपट रिलीज झाला आहे. हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट आंध्र प्रदेशमधील डोंगराळ भागात सुरू असलेल्या लाल चंदनच्या तस्करीवर आधारित आहे. या चित्रपटातील पात्र आणि कथा पूर्ण करण्यासाठी आणि रंगवण्यासाठी आणखी कालावधीची गरज असल्यामुळे हा चित्रपट दोन वेगवेगळ्या भागांमध्ये रिलीज केला जाणार असल्याचे निर्माते नवीन येर्नेनी यांनी सांगितले होते.