औकात काढणाऱ्या पंकजा मुंडेंवर धनंजय मुंडेंचा पलटवार!


बीड – सध्या राज्यात विविध ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. विरोधी पक्षांवर तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांवर जोरदार टीका, टिप्पणी नेतेमंडळींकडून सुरू असल्याचे दिसत आहे. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असे वातावरण बीड जिल्ह्यात देखील निर्माण झालेले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रचारसभा सुरू असून, यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. पंकजा मुंडे यांनी केलेल्या टीकेला आता धनंजय मुंडे यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.

बीड येथील आष्टी येथे एका प्रचार सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, आमची औकात काढणाऱ्यांना परळीच्या जनतेने दाखवले आहे. येथे आमची औकात काढणाऱ्यांना आष्टीच्या जनतेने दाखवले आहे. तसेच, एखाद्या गावात जर पालकमंत्री आणि मंत्रीमंडळातील मंत्री म्हणून मी ५० कोटी किंवा १०० कोटींची घोषणा करत असेल आणि आम्ही जर आमच्या शब्दाला जागे राहत असू, तर तुम्ही आमच्यावर टीका करणार त्यांची औकात आहे का द्यायची.

तुम्ही तर पाच वर्षे राज्याच्या सत्तेत होता. केंद्राच्या सत्तेत होता, येथील आमदार भाजपचा होता, तुम्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या, एक नाही तर दोन आमदार झाले. तरी देखील तुमची औकात विकासाला पैसे द्यायची का दाखवता आली नाही? राहिला माझ्या औकातीचा प्रश्न २०१९ च्या निवडणुकीत महिला बालकल्याणमंत्री, ग्रामविकासमंत्री, जलसंधारणमंत्री या तीन चार मंत्र्यांचा एकदाच ३२ हजार मतांनी पराभव केला ना, ही आमची औकात असल्याचेही धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवले.

त्याचबरोबर, अमित शहा काल पुण्यात आले. नरेंद्र मोदी नंतर सगळ्यात मोठे भाजप नेते पुण्यात. मी हिशोब लावत होतो की गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजप सगळीकडे आहे. मी काल रात्री केजला सभेसाठी गेलो, केजमध्ये कुठेही मला एक साधे कमळाचे चिन्ह देखील दिसले नाही. हा जिल्हा, केज मतदारसंघ भाजपचा जिल्ह्याचा खासदार भाजपाचा, एक विधानपरिषदेचा आमदार भाजपचा वारसा चालवणाऱ्या आमच्या ताईसाहेब भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस आणि केजमध्ये कमळच नाही. कुठे आहे भाजपा? येथे सुद्धा लाज वाटली पाहिजे, अरे एक काळ भाजपचा आम्ही असा पाहिला, त्या काळात एक जरी मत मिळाले, तरी कमळाचे चिन्ह द्यायचे, कारण चिन्हावर मत मिळावे म्हणून. एक मत मिळाले तरी. आता या बीड जिल्ह्यात भाजपवर अशी वेळ आली, की कमळावर मत मिळत नाही. म्हणून कमळच काढून घ्यायचे आणि दुसरे काहीतरी उभे करायचे. इथे देखील तसेच केले, तीन वॉर्डात कमळ नाही. अरे लाज वाटली पाहिजे. तुम्ही जर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या सत्ता भोगता आणि देशात शतप्रतिशत भाजपा आहे, तर मग आष्टीच्या तीन ठिकाणी कमळ का नाही? कारण तुम्हाला माहिती आहे, त्या कमळावर तिथे मत मिळत नाही. हे राजकारण जनतेने लक्षात घ्या. या जिल्हयात आज भाजप लयास आली असल्याचे देखील धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

तर, या नगरपंचायतीच्या निवडणुकीत दिवाबत्ती, घरकुल, स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज काढणे आणि करणे हे सगळे आमचे कर्तव्य आहे. जर कुणी म्हणत असेल, की आम्ही अशा पद्धतीने विकास केला. तो विकास नाही ते तुमचे कर्तव्य आहे. जर मी परळीत रस्ते, ड्रेनेज, सभागृह, स्वच्छता हे केले असेल, तर ते माझे कर्तव्य आहे, तो विकास नसल्याचे म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना धनंजय मुंडेंवर परखड टीका केली होती. जेव्हा तुमच्या ताई निवडून आल्या, मंत्री झाल्या. तेव्हा त्या पहिल्या चार मंत्र्यांमध्ये होत्या. असे ३२ व्या नंबरवर मी कधीच गेले नसल्याचे त्या म्हणाल्या. याशिवाय पंकजांनी जिल्ह्यासाठी मिळवलेल्या निधीवरूनही निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकीत निवडून आल्यानंतर जिल्ह्याच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देऊ, असे आश्वासन दिले होते. एक नव्हे तर पाटोदा, शिरूर, आष्टी, केज आणि वडवणी अशा पाचही ठिकाणी त्यांनी ही घोषणा केली होती. एका झटक्यात ५०० कोटी रुपये द्यायला तयार होतात, पण दोन वर्ष उलटूनही निधी मिळाला नाही. मग दोन वर्षे काय टाळे पिटत होते का? असा सवाल करत ते पैसे द्यायची यांची ताकदच नसल्याचा टोला पंकजांनी लगावला होता.