फिलीपाइन्समधील चक्रीवादळात 208 जणांचा मृत्यू, अनेक जखमी


मनिला : राय चक्रीवादळामुळे फिलीपाइन्समध्ये हाहा:कार उडाला असून या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे मृत्यू झालेल्यांची 208 झाली आहे. तर, अनेकजण बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. 208 जणांच्या मृत्यूला नॅशनल पोलिसांनी दुजोरा दिला आहे. राय चक्रीवादळामुळे फिलीपाइन्स बेट समूहाच्या दक्षिण आणि मध्य क्षेत्रामध्ये मोठे नुकसान झाले आहे. 239 जण या भागांमध्ये जखमी झाले असून 52 जण बेपत्ता झाले आहेत. देशात मागील काही वर्षांमध्ये आलेल्या घातक वादळांपैकी हे एक वादळ असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुरुवारी राय चक्रीवादळामुळे फिलीपाइन्समध्ये शेकडो लोक बेघर झाले आहेत. देशात चक्रीवादळ धडकल्यानंतर जवळपास तीन लाख नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. समुद्र किनाऱ्याजवळ राहणारे नागरीक, रिसॉर्टमधील पर्यटक, कर्मचाऱ्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. फिलीपाइन्स रेड क्रॉसने किनारी भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती दिली. घरे, रुग्णालये, शाळांसह इतर इमारतींचे ही मोठे नुकसान झाले असल्याची माहिती रेडक्रॉस फिलीपाइन्सचे अध्यक्ष रिचर्ड गॉर्डन यांनी दिली.

अनेक घरांचे या चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. घरांचीही पडझड झाली आहे. अनेक झाडे वादळांमुळे तुटली आहेत. विजांचे खांबही तुटले आहेत. काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बोहोल बेटावर मोठ्या नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. चॉकलेट हिल्स भागात 74 जण ठार झाले आहेत. 195 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या हवेमुळे सिरगाओ, दीनागट आणि मिंडानाओ बेटावर मोठे नुकसान झाले आहे.

2013 साली आलेल्या हैयान या चक्रीवादळाशी या चक्रीवादळाची तुलना केली जात आहे. हैयान चक्रिवादळ सर्वात घातक चक्रीवादळ होते. सध्या राय चक्रीवादळामुळे फिलीपाइन्समधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. हजारो सैन्य, पोलीस, तटरक्षक दल आणि अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्यात गुंतले आहेत.