सशस्त्र ड्रोन- भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

डीआरडीओने भारतीय सेनेच्या तिन्ही दलांसाठी गेल्या काही वर्षात सशस्त्र ड्रोन बनविण्याच्या दृष्टीने वेगवान प्रगती केली असून येत्या काही वर्षात सेनेच्या तिन्ही दलांमध्ये अशी ड्रोन समाविष्ट केली जात असल्याचे जाहीर केले आहे. सध्याची गरज भागविण्यासाठी अमेरिकेकडून ३० सशस्त्र ड्रोन खरेदी केली जात असून सेनेच्या प्रत्येक विभागाला १०-१० ड्रोन मिळणार आहेत. मात्र डीआरडीओने सशस्त्र ड्रोनसाठीची प्रयोगशाळा कार्यरत केली असल्याचे समजते. डीआरडीओची सध्याची मानवरहित रुस्तम जी २ सशस्त्र ड्रोनमध्ये परिवर्तीत केली जाणार आहेत. ही नवी ड्रोन शत्रूवर १०० किमी अंतरावरून बॉम्ब,मिसाईल डागण्यास सक्षम असतील असे समजते.

आजकालच्या युद्धात ड्रोनचे महत्व वेगाने वाढले आहे. काही काळापूर्वी ड्रोनचा वापर हेरगिरी किंवा निगराणीसाठी केला जात होता मात्र आता शत्रूवर हल्ला करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होत आहे. आगामी काळात सर्व युद्धे विना पायलट सशस्त्र ड्रोनच्या सहाय्यानेच होतील आणि त्यादृष्टीने भारताने आत्मनिर्भर व्हायला हवे असा निर्णय घेतला गेला आहे.

डीआरडीओचे माजी वैज्ञानिक डॉ. रवी गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार रुस्तम दोन आताही शस्त्र वाहतूक करण्यास सक्षम आहे. अशी ड्रोन बनविण्यासाठी उपयुक्त सर्व तंत्रज्ञान भारताकडे आहे. त्यामुळे सशस्त्र ड्रोन बनविणे भारताला सहज शक्य आहे आणि तशी ती बनविली जात आहेत. परिणामी शेजारच्या देशांना भारताची दहशत वाटते आहे असेही ते म्हणाले.