मानसिक तणावाचे दुष्परिणाम दिसून येतात पाठीच्या कण्यावरही .

spine
सुदृढ आणि व्याधीमुक्त शरीर आणि मन हे खऱ्या अर्थाने आरोग्याचे लक्षण म्हणता येईल. आपल्या शारीरिक आरोग्याइतकेच आपले मानसिक आरोग्य देखील महत्वपूर्ण असते. कारण जर मन अस्वस्थ असेल, तर याचे परिणाम शरीरामध्ये कोणत्या न कोणत्या व्याधीच्या रूपाने दिसून येत असतात. याचे उदाहरण द्यायचे झाले, तर पाठदुखीचे देता येईल. पाठदुखीचा अनुभव आपण सर्वांनीच कधी ना कधी घेतलेला आहे. पण पाठ दुखत आहे ही शारीरिक व्याधी म्हणून त्यावर उपचार करीत असतानाच आपल्या पाठदुखीचा संबंध आपण अनुभवत असलेल्या मानसिक तणावाशी तर नाही, याचीही खात्री करून घेणे आवश्यक असते.
spine1
जसजसे वैद्यक शास्त्र प्रगत होत आहे, तसे नवनवीन अभ्यास समोर येत आहेत. या अभ्यासाच्या आधारे आता पाठदुखीवर उपचार करताना शारीरिक अस्वास्थ्यासोबतच मानसिक अस्वास्थ्याचा विचार वैद्यकीय तज्ञ करत आहेत. किंबहुना शारीरिक व्याधी आणि मानसिक अस्वास्थ्य यांचा फार जवळचा संबंध असल्याचे विज्ञानाने निश्चितपणे सिद्ध केलेले आहे. याच संबंधाना विज्ञानाने ‘सायकोसोमॅटिक्स’ असे नाव दिले आहे. शारीरिक आरोग्याचा संबंध मानसिक स्वास्थ्याशी असल्याच्या निष्कर्षाप्रत विज्ञान अलिकडच्या काळामध्ये पोहोचले असले, तरी चीनी तज्ञांना मात्र हे ज्ञान फार पूर्वीपासून होते. शरीरस्वास्थ्याचा संबंध, मन तणावविरहित असण्याशी असल्याचे जाणून घेऊन चीनी तज्ञांनी पाठदुखीवरची उपचारपद्धती फार पूर्वीपासूनच शोधली होती.
spine2
मानसिक तणावाचा परिणाम केवळ पाठदुखी आणि डोकेदुखी यांद्वारेच पाहायला मिळतो असे नाही, तर मधुमेह, लठ्ठपणा, अॅस्थमा, हृदयरोग, या आणि अश्या अनेक व्याधींच्या रूपात पहावयास मिळत असतो. लहान मुलांमध्ये देखील मानसिक तणावाचा परिणाम पाठदुखीच्या रूपामध्ये समोर येत असल्यास कालांतराने याचा थेट परिणाम पाठीच्या कण्यावर होऊ लागतो. या व्याधीला वैद्यकीय भाषेमध्ये ‘स्कोलीयोसीस’ म्हटले जाते. हा आजार प्रामुख्याने लहान मुलांमध्ये पहावयास मिळतो. या आजारामध्ये मुलाच्या पाठीचा कणा एका बाजूला वाकू लागतो, आणि काही काळाने त्याचा आकार इंग्रजी ‘c’ अक्षराप्रमाणे दिसू लागतो. जी मुले लहानपणापासून तणावाने भरलेल्या वातावरणामध्ये राहत असतात, आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत असतात, त्या मुलांच्या बाबतीत हा आजार उद्भविण्याची शक्यता असते.
spine3
मानसिक तणावामुळे पाठदुखी उद्भवित असल्याचे लक्षात आल्यास या तणावाला कारणीभूत असलेल्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनातून दूर करण्याचा प्रयत्न करणे हा सर्वप्रथम उपाय आहे. जर या गोष्टी दूर करणे शक्य नसेल, तर यांच्याशी निगडित तणाव कश्या प्रकारे हाताळावा यासंबंधी तज्ञांचा सल्ला घेणे हितकारी ठरू शकते. त्यामुळे पाठदुखी उद्भवली, तर ती केवळ शारीरिक व्याधी आहे असे न समजता याचा आपल्या मानसिक तणावाशी संबंध नसल्याची खात्री करून घेऊनच पुढील उपचार करावेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment