VIDEO : अ‍ॅशेस कसोटी सामना सुरू असताना अचानक कोसळली वीज


विजेच्या कडकडाटामुळे अ‍ॅडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दिवस-रात्र अ‍ॅशेस कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ लवकर संपवावा लागला. ही घटना इंग्लंडची फलंदाजी सुरू असताना घडली. मायकल नेसर या डावातील नववे षटक करत होता. तेवढ्यात मोठा आवाज झाला आणि स्टेडियमच्या अगदी जवळ वीज पडली. सुदैवाने वीज स्टेडियममध्ये पडली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. हा वीज पडतानाचा एक फोटोही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) शेअर केला आहे. यानंतर पंचांनी खेळाडूंना ड्रेसिंग रूममधून बाहेर पडण्यास सांगितले.


विजांच्या कडकडाटानंतर हलका पाऊस सुरू झाला. त्यानंतर अंपायरने दिवसाचा खेळ संपवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी तिसऱ्या दिवसाचा खेळ १९ मिनिटे आधी सुरू करण्यात आला. अ‍ॅशेस कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाने १७ धावांत २ विकेट गमावल्या होत्या. हसीब हमीद ६ आणि रोरी बर्न्स ४ धावा करून बाद झाले. डेव्हिड मलान १ आणि कर्णधार जो रुट ५ धावांवर नाबाद होते.


तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ४७३ धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनने शानदार शतक झळकावले. त्याने ३०५ चेंडूंचा सामना करत ८ चौकार मारले. स्टीव्ह स्मिथ ९३ धावा करून बाद झाला. त्याचवेळी डेव्हिड वॉर्नरचेही शतक हुकले. त्याचबरोबर यष्टीरक्षक फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरीने कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने १०७ चेंडूत ५१ धावा केल्या. खालच्या क्रमवारीत मिचेल स्टार्क आणि मायकेल नेसर यांनी फलंदाजीत कमाल केली. नेसरने २४ चेंडूत ३५ धावा केल्या. स्टार्कने ३९ चेंडूत ३५ धावा केल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने ३ आणि जेम्स अँडरसनने २ बळी घेतले. डावाच्या आधारे इंग्लंड अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा ४५६ धावांनी मागे आहे.