‘हाय रिस्क’ देशातून साताऱ्यात आलेल्या तिघांना ओमिक्रॉनची लागण


सातारा – दक्षिण आफ्रिकेच्या युगांडा येथून सातारा जिल्ह्यातील फलटण येथे आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांचे काही दिवसांपूर्वीच विलगीकरण करण्यात आले होते. याबाबतची अधिकृत माहिती सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

अखेर सातारा जिल्ह्यात ओमिक्रॉनचा प्रवेश झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण शहरामध्ये आठ दिवसांपूर्वी युगांडा येथून एक कुटुंब आले आहे. या कुटुंबातील पती, पत्नी आणि दोन लहान मुले कोरोनाबाधित आढळली होती. या कुटुंबाचे नमुने पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते.

शनिवारी त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, या कुटुंबातील तिघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट झाले असून फलटण शहरात विविध उपाययोजना राबवण्यात सुरुवात केली आहे.

चार जण फलटण शहरात ११ डिसेंबर रोजी पूर्व आफ्रिकेत असणाऱ्या युगांडा देशातून आले होते. याची माहिती प्रशासनाला मिळताच प्रशासनाकडून दोन दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. १३ तारखेला त्यांचा शोध लागल्यावर पालिकेअंतर्गत येणाऱ्या नागरी आरोग्य सुविधा केंद्रात या चार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत ते कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. या सर्वांना उपजिल्हा रुग्णालय फलटण याठिकाणी स्वतंत्र कक्षात विलगीकरण केले आहे.