ही आहेत ओमिक्रॉनची प्रमुख लक्षणे


नवी दिल्ली – कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरात धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव जगातील 77 देशांमध्ये झाला असल्यामुळे सर्वच देशांमध्ये सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट हा इतर कोरोनाच्या प्रकारापेक्षा अधिक धोकादायक असून वेगाने पसरणारा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)म्हटले आहे.

जगभरातील शास्त्रज्ञ ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या धोक्यामुळे संशोधनावर भर देत लक्षणे आणि उपाय शोधण्यासाठी परिश्रम घेत आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या लक्षणांबाबत एका संशोधनात अभ्यास करण्यात आला. सध्या उपलब्ध कोरोना लसींना ओमिक्रॉन व्हेरिएंट अत्यंत प्रतिरोधक आहे. उपलब्ध असलेल्या कोरोना लसींपैकी कोणतीही लस ओमिक्रॉन व्हेरिएंटवर पूर्णपणे प्रभावी नाही. आतापर्यंतच्या परिणामांवरून असे दिसून आले आहे की कोरोनाच्या सुरुवातीच्या प्रकारांच्या तुलनेत या नवीन प्रकारामध्ये लक्षणे कमी गंभीर असल्याचे आढळून आले आहे. पण सर्व ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये घसा खवखवणे हे समान लक्षण आढळून आले आहे.

याबाबत माहिती देताना दक्षिण आफ्रिकेमधील डिस्कव्हरी हेल्थ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रायन नॉच यांनी सांगितले की, ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांमध्ये आढळलेली काही लक्षणे इतर व्हेरिएंटपेक्षा वेगळी असल्याचे समोर आले आहे. यामध्ये घसा खवखवणे हे एक लक्षण समान असल्याचे डॉ. नॉच यांनी म्हटले आहे. यासह नाक चोंदणे, कोरडा खोकला आणि पाठ दुखणे ही लक्षणेही आढळली आहेत. डॉ. रायन नॉच यांनी पुढे सांगितले की, यापैकी बहुतेक लक्षणे सौम्य आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की ओमिक्रॉन कमी धोकादायक आहे, असा नाही.