जगातील पहिल्या Text Messageला लिलावात आतापर्यंत लागली १.७१ कोटींची बोली


नवी दिल्ली – १९९२ साली जगातील पहिला टेक्स्ट एसएमएस पाठवला गेला होता. एका व्होडाफोन कर्मचाऱ्याने हा मॅसेज दुसऱ्या कर्मचाऱ्याला पाठवला होता. या एसएमएसचा २९ वर्षानंतर लिलाव होत आहे. एक डेव्हलपर आणि इंजिनिअर म्हणून नील पापवोर्थ कंपनीत काम करत होते. तेव्हा एसएमएस एका कम्प्यूटरच्या माध्यमातून रिचर्ड जारविस यांना पाठवला होता. रिचर्ड जारविस तेव्हा कंपनीचे डायरेक्टर होते आणि त्यांच्या ऑर्बिटल 901 हँडसेटवर एसएमएस पाठवला होता. या १४ अक्षरांचा समावेश होता, असे व्होडाफोनने सांगितले आहे. या मॅसेजमध्ये त्यांनी ख्रिसमसच्या शुभेच्छा देत Merry Christmas असे लिहीले होते. ३ डिसेंबर १९९२ रोजी पाठवलेल्या या टेक्स्ट मॅसेजचा लिलाव होत असून जवळपास १ कोटी ७१ लाख रुपयांची बोली लागली आहे.


पॅरिसमधील एगट्स ऑक्सन हाउसमध्ये एसएमएसची डिजिटल प्रतिचा लिलाव होत आहे. हा लिलाव २१ डिसेंबर २०२१ पर्यंत असणार आहे. त्यामुळे लिलावाची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. जेव्हा १९९२ साली एसएमएस पाठवला, तेव्हा कल्पना नव्हती की, मॅसेज एवढा लोकप्रिय होईल. या मॅसेजबद्दल मी आपल्या मुलांना सांगितल्याचे नील पापवोर्थ यांनी म्हटले. जारविस त्याला रिप्लाय देऊ शकले नाही. कारण त्यावेळी फक्त मॅसेज मिळण्याची सोय होती, असंही त्यांनी पुढे सांगितले. स्कायच्या म्हणण्यानुसार, २००७ मध्ये यूके दरवर्षी ६६ अब्ज मजकूर संदेश पाठवत होते. २०१२ पर्यंत एसएमएसचे प्रमाण १५१ अब्जपर्यंत वाढले होते.