शिवाजी महाराजांची विटंबना करणाऱ्यांना जे संरक्षण देतील त्यांना देश माफ करणार नाही – अजित पवार


पुणे – अशा कुठल्याच घटनेने छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी जराही कमी होणार नाही, पण अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नसल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. कर्नाटकातील बंगळुरु शहरात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना घटनेबद्दल ते बोलत होते. त्यांनी या घटनेविषयी दु:ख व्यक्त करत त्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशाची छत्रपती शिवाजी महाराज हे अस्मिता आहेत. ते सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासीयांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे. पुतळा विटंबनेच्या या घटनेबद्दल महाराष्ट्रासह समस्त देशवासियांच्या भावना अत्यंत तीव्र असून मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो.

या घटनेकडे कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकारने गांभीर्याने पहावे, दोषींना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

जर कोणी आमच्या अस्मितेचा कोणी अपमान करत असेल तर सहन करणार नाही – जयंत पाटील
राज्याचे जलसिंचन मंत्री जयंत पाटील या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले, काही समाजकंटकांनी बंगळूर येथे संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे समजले. हा प्रकार अत्यंत संताप आणणारा आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या घटनेचा तीव्र निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहे. आमच्या अस्मितेचा कोणी अपमान करत असेल तर आम्ही हे कदापी सहन करणार नाही. कर्नाटक सरकारने या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जयंत पाटलांनी केली.