राज्य सरकारचे मुंबईतील मोठ्या पार्ट्यांकरिता कठोर निर्बंध


मुंबई : राज्य सरकारने ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दक्षता बाळगली आहे. राज्य सरकारने मोकळ्या जागांवर होणाऱ्या मोठ्या पार्ट्यांकरता मुंबईत कठोर निर्बंध घातले आहेत. मुंबईत मोकळ्या जागी जसे रेसकोर्स, मोठी मैदाने येथे होणाऱ्या जंगी कार्यक्रमांना केवळ २०० लोकांनाच परवानगी देण्यात आल्याची माहिती आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली आहे. बँन्क्वेट हॉल, बंदीस्त जागी क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेपर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे. तर मोकळ्या जागांवर क्षमतेच्या २५ टक्के लोकांनाच परवानगी मिळणार आहे. त्याचबरोबर घरी होणाऱ्या पार्ट्यांवर देखील पालिकेची नजर असणार आहे. लोकांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे असे आवाहनही आयुक्त इकबालसिंह चहल यांनी केले आहे.

मुंबईतील मोठ्या पार्ट्यांकरिता अशी असेल नियमावली

  • ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त लोकांना बंदिस्त सभागृह, बंदिस्त रेस्टॉरंट, हॉलमध्ये एकत्र येता येणार नाही.
  • २५ टक्के क्षमतेपेक्षा जास्त लोकांना मोकळ्या जागी एकत्र येता येणार नाही.
  • ३१ डिसेंबर आणि ख्रिसमस निमीत्त होणाऱ्या पार्ट्यांवर नजर ठेवण्याकरता प्रत्येक वॉर्डमध्ये महापालिकेची ४ पथके तैनात असतील.
  • नियम मोडणाऱ्या पार्ट्या आढळल्यास संबंधित रेस्टॉरंट मालक, हॉटेल मालक यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.

योग्य ती खबरदारी ३१ डिसेंबर आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून घेतल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली आहे.

ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रातही हळूहळू वाढ असल्याचे चित्र दिसत आहे. शुक्रवारी ओमिक्रॉनच्या आठ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या 40 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत. देशातील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या 111 वर पोहचली आहे. यामुळेचे मुंबई पालिकेने देखील खबरदारी म्हणून कठोर निर्बंध घातले आहेत.