पीएनजी-सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ


नवी दिल्ली : पुन्हा एकदा सीएनजी, पीएनजी दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजी प्रतिकिलो 2 रुपयांनी महाग झाला आहे. तर घरगुती पाईप गॅसचे दर प्रति युनिट दीड रुपयांनी वाढले आहेत. या दरवाढीनंतर सीएनजी 63.50 रुपये किलो असेल, तर पीएनजीसाठी 38 रुपये मोजावे लागणार आहेत. या दरवाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सीचे प्रवासी भाडे वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काल (17 डिसेंबर) मुंबईमध्ये सीएनजीचा दर 61.50 होता, तर आजचा (18 डिसेंबर) दर हा 63.50 रूपये आहे. गेल्या 3 महिन्यात चौथ्यांदा ही दर वाढ झाली आहे. मुंबईमध्ये जवळपास 8 लाख लोक आहेत, जे सीएनजी वाहनाचा वापर करतात. त्यांना या दरवाढीमुळे फटका बसला आहे.

आता टॅक्सी चालक आणि ऑटोरिक्षा युनियन प्रवासी भाड्यांमध्ये 2 ते 5 रूपयांची वाढ करण्याची मागणी करत आहेत. मुंबईसोबतच लखनऊ, उन्नाव आणि आग्रा येथे देखील सीएनजी आणि पीएनजी दरात वाढ झाली आहे.

लखनऊ, उन्नाव आणि आग्रामध्ये आज (18 डिसेंबर) सकाळपासून सीएनजीची किंमत 72.50 रुपये झाली असून अयोध्यामध्ये 72.95 रुपये किंमत झाली आहे. आत्तापर्यंत सीएनजीची किंमत येथे 70.50 रुपये होती. लखनऊ आणि आग्रा येथे पीएनजीची किंमत 1 रूपये प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटर वाढली असून आता ही किंमत 38.50 रुपये/ स्टँडर्ड क्यूबिक मीटर झाली आहे.