फायझरच्या लसीचे तीन डोस घेतल्यानंतरही झाली ओमिक्रॉनची लागण


मुंबई – कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची शुक्रवारी अमेरिकेतून परतलेल्या २९ वर्षीय व्यक्तीला लागण झाल्याचे आढळून आल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने फायझरच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे तीन डोस घेतले आहेत. पण, त्या व्यक्तीमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.

नऊ नोव्हेंबर रोजी विमानतळावर झालेल्या कोरोना चाचणीत या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यानंतर त्याचा नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला होता. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या दोन लोकांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचेही महानगरपालिकेने सांगितले. महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार, रुग्णाला खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.

यानंतर आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाच्या ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या १५ झाली आहे. पण, यापैकी १३ रुग्णांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. महानगरपालिकेने असेही म्हटले आहे की आतापर्यंत संक्रमित १५ ओमिक्रॉनपैकी कोणालाही गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत. पण, महाराष्ट्रात ओमिक्रॉनबाधितांची संख्या आता ४० झाली आहे.