किरीट सोमय्यांचा पुन्हा एकदा अजित पवारांसह धनंजय मुंडेंवर हल्लाबोल


मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हल्लाबोल केला आहे. तुम्ही लुटा, चोरी करा, ३-३ बायका करा आणि आरोप केले की गोरगरीब म्हणायचे. धनंजय मुंडे गोरगरीब आहे का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. तसेच धनंजय मुंडे यांच्यावर ३ बायका करून त्यांच्या मुलांना स्वतःचे नाव दिल्याचाही आरोप सोमय्या यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना केला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, मीडिया एजन्सीने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे की तुम्ही चोरी करा, लुटा, ३-३ बायका करा आणि किरीट सोमय्यांनी आरोप केले, तर तुम्ही म्हणायचे गोरगरीबांचा. धनंजय मुंडे गोरगरीब आहे का? त्यांना ३ बायका आहेत, त्यांच्या मुलांना स्वतःचे नाव देतात. त्यांनी शेतकऱ्यांची जमीन हडपली आहे. त्यांच्याकडे जगमित्र साखर कारखान्यासाठी ८३ कोटी रुपये आले कोठून? त्यांनी साखर कारखान्याच्या नावाने हिंदू मंदिरांची जमीन लाटली. धनंजय मुंडे यांना उत्तर तर द्यावेच लागेल.

अजित पवारांवर टीका केल्यास माफ करणार नसल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. किरीट सोमय्या यांनी त्यावर रोहित पवारांच्या माफीला कोण विचारते असे उत्तर दिले. आज माफी मागण्याची वेळ अजित पवार यांच्यावर आहे. अजित पवार यांनी आपल्या ताई, आपली माई, आपली आई, आपली पत्नी, आपले पुत्र यांच्या नावावर बेनामी संपत्ती उभी केल्याचे आरोप किरीट सोमय्या यांनी केले.

१०५० कोटी रुपयांची अजित पवार यांची बेनामी संपत्ती जप्त झाली. खूप वर्ष महाराष्ट्राला शरद पवार, अजित पवार, रोहित पवार अथवा पार्थ पवार कुणीही असो यांनी बनवले, फसवले, लुटले. आत्ता तर हिशोब द्यावा लागेल, असे म्हणत सोमय्या यांनी पवार कुटुंबाला इशारा दिला आहे.