छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त प्रतिक्रिया


बंगळुरु : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबने संदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून राज्यभरात आणि सीमाभागात संताप व्यक्त करण्यात येत आहे. बंगळुरातील घटना ही लहान-सहान असून त्यावरुन सरकारी वाहनांचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे ही प्रवृत्ती चांगली नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले की, बंगळुरु येथे शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो. अशा लहान सहान गोष्टीवरून दगडफेक करणे, सरकारी वाहनांचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे ही प्रवृत्ती चांगली नव्हे. कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत गृहमंत्र्यांना सांगितले आहे. पुतळ्याची विटंबना करणे हे देशभक्तांचे काम नव्हे. महापुरुषांचे पुतळे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी उभारलेले असतात.

दरम्यान बेळगाव, कोल्हापूर आणि सीमाभागातून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. तसेच मुंबईतील भाजप कार्यालयावर मोर्चा काढत शिवप्रेमींनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

त्याचबरोबर या घटनेचा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: यामध्ये लक्ष घालावे अन् दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. विटंबना करणाऱ्या हिणकस आणि विकृत प्रवृत्तीचा बिमोड करा, आता क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी गंभीर दखल घ्यावी, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.