मुलींचे लग्नाचे वय वाढवण्याला असदुद्दीन ओवेसींचा विरोध


नवी दिल्ली – मुलींच्या विवाहाचे वय हे 18 वरुन 21 वर नेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मुलींचे विवाहासाठी किमान वय 18 वरून 21 वर्ष करणारे विधेयक सरकार याच अधिवेशनात आणणार आहे. केंद्रीय कॅबिनेटने या प्रस्तावाला गुरुवारी मंजुरी दिली आहे.

यावर बोलताना एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान निवडू शकतो तर पार्टनर का नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ओवेसींनी म्हटले आहे की, 18 वर्षाच्या वयात एक भारतीय व्यक्ती करारांवर सही करु शकतो, व्यवसाय सुरु करु शकतो, पंतप्रधान निवडू शकतो, तर मग लग्न का करु शकत नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी पुढे म्हटले आहे की, आपण सरकार आहोत, गल्लीतील चाचा किंवा अंकल नाहीत की कुणी लग्न करावे, काय खावे याचा निर्णय घ्यावा. माझे मत आहे की, मुलांचे लग्नाच्या वयाची अट 21 वरुन 18 वर्ष करायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेत अशी अनेक राज्य आहेत, जिथं लग्नाच्या वयाची अट वय 14 वर्ष आहे. ब्रिटन आणि कॅनडामध्ये लग्नाच्या वयाची अट 16 वर्ष आहे.