रामदास कदमांच्या आरोपांवर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…


मुंबई – आज स्पष्टपणे शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यातील वाद उघड झाला आहे. कारण, आज पत्रकारपरिषद घेत रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर अनिल परब हे शिवसेना संपवायला निघाले आहेत. शिवसेनेचा मतदारसंघ ते राष्ट्रवादीच्या घशात घालत आहेत. गद्दार मी नाही, तर शिवसेनेचा गद्दार अनिल परब असल्याचे रामदास कदम यांनी जाहीरपणे वक्तव्य केले. तर, रामदास कदम यांच्या या गंभीर आरोपावर मंत्री अनिल परब यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.

मंत्री अनिल परब यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या आरोपावर बोलताना, मी याबाबतीत काही बोलू इच्छित नाही. याबाबत नो कॉमेंट्स.. असे म्हणत, यावर फार भाष्य करण्याचे टाळले. तर, तुम्हाला रामदास कदम यांनी गद्दार असे म्हटले आहे, असे सांगत माध्यमांनी परब यांनी प्रतिक्रिया विचारली, तेव्हा परब यांनी, त्यांनी काही म्हणू दे. माझ्यावर काही जरी आरोप केले तरी त्यावर त्याचे उत्तर मी देणार नाही. मी एक शिवसैनिक आहे ते शिवसेनेचे नेते आहेत. याबाबतची जी काही दखल घ्यायची आहे ती पक्ष घेईल, अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली.

तत्पूर्वी रामदास कदम अनिल परबांवर टीका करताना म्हणाले होते की, अनिल परब शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघाला आहे. शिवसेनेची नगरपरिषद राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघाला आहे. गद्दारांनी हाताशी घेऊन स्थानिक शिवसेनेच्या आमदारास बाजूला ठेवून हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालण्यासाठी अनिल परब निघाला आहे, तो गद्दार आहे. घोषणा द्यायच्या असतील, तर त्याच्याविरोधात द्या. तसेच, जेव्हा मी संघर्ष करत होतो, तेव्हा अनिल परब कुठे होता? असा सवाल देखील रामदास कदम यांनी उपस्थित केला होता.