समीर वानखेडेचा एनसीबी कार्यकाल ३१ डिसेंबरला संपणार

अमली पदार्थ विरोधी दलाचे झोनल डायरेक्टर आणि गेले काही महिने सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले समीर वानखेडे यांचा या पदाचा कार्यकाल ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत असून या पदासाठी ते एक्स्टेन्शन घेणार नसल्याचे सांगितले जात आहे. २००८ च्या आयआरएस बॅचचे अधिकारी समीर वानखेडे सप्टेंबर २०२० मध्ये एनसीबीच्या मुंबई शाखेत झोनल डायरेक्टर पदावर डेप्युटेशनवर आले होते.

मिडिया रिपोर्ट नुसार गेले काही महिने समीर वानखेडे यांच्या विरोधात वाद सुरु आहेत. त्यामुळे या पदावर मुदतवाढ न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सुशांतसिंग राजपूतच्या संशयास्पद मृत्यु नंतर ड्रग सिंडीकेट विरुद्ध सुरु झालेल्या कारवाईत वानखेडे सामील होते. या सिंडीकेट मध्ये अनेक बॉलीवूड कलाकार सामील असल्याचे पुरावे मिळाले आहेत. ऑक्टोबर मध्ये वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई किनाऱ्यावर एका क्रुझवर घातलेल्या धाडीत मादक पदार्थ मिळाले होते. त्यावेळी बॉलीवूड कलाकार शाहरुख यांचा मुलगा आर्यन खान याच्या सह ८ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले होते.

ही धाड बनावट होती आणि शाहरुखकडून खंडणी उकळण्यासाठी हा कट रचला गेल्याचा आरोप केला गेला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री नबाब मलिक यांनी वानखेडे मुस्लीम असून त्यांनी खोटे जात प्रमाणपत्र दाखवून सरकारी नोकरी मिळविल्याचा आरोप केला होता. यावर वानखेडे यांच्या वडिलांनी अब्रूनुकसानीचा दावा मलिक यांच्या विरोधात दाखल केला असून त्याची सुनावणी सुरु आहे. या सर्व प्रकारांमुळे वानखेडे यांनी एनसीबीचा कार्यकाल संपताच येथे मुदतवाढ न घेण्याच निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. वानखेडे यांचे पुढचे पोस्टिंग कुठे असेल याचा काहीही अंदाज दिला गेलेला नाही.