बांग्लादेशात ५० वर्षानंतर रमणा काली मंदिरात घंटानाद

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बांग्लादेशातील पुनर्निर्माण करण्यात आलेल्या ऐतिहासिक रमणा काली मंदिराचे उद्घाटन झाले असून ५० वर्षानंतर या मंदिरात पुन्हा घंटानाद झाला आहे. शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रपती कोविंद यांच्या सह त्यांच्या पत्नी सविता कोविंद याही सहभागी झाल्या होत्या. बांग्लादेशाला स्वातंत्र मिळाल्याला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त देशात स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असून बांग्लादेशचे राष्ट्रपती एम. अब्दुल हमीद यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रपती कोविंद तीन दिवसांच्या बांग्ला देश भेटीवर गेले आहेत.

१९७१ मध्ये पाकिस्तानने बांग्लादेश स्वातंत्र्याच्या लढा चिरडून टाकण्यासाठी केलेल्या आक्रमणात ऐतिहासिक रमणा काली मंदिराला आग लावून ते नष्ट केले होते. त्यावेळी या मंदिरात आणि आसपास राहणारे अनेक नागरिक या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. या मंदिराचे पुनर्निर्माण केले गेले असून त्यासाठी भारतानेही मदत केली आहे. मुस्लीम बहुल बांग्लादेशात १० टक्के हिंदू वास्तव्यास आहेत.

मंदिराचे उद्घाटन केल्यावर राष्ट्रपती कोविंद म्हणाले, भारत आणि बांग्लादेश मधल्या सांस्कृतिक व अध्यात्मिक नात्यांचे हे प्रतिक आहे. या मंदिराचे उद्घाटन करण्याची संधी म्हणजे काली मातेचा आशीर्वाद असल्याची भावना यावेळी राष्ट्रपतींनी व्यक्त केली.