दोन दिवसांच्या बँक संपामुळे ३८ लाख चेक अडकले

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी देशभरातील सर्व राष्ट्रीय बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर गेल्याने बँकिंग सेवा ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे. हा संप आता संपला असला तरी या दोन दिवसांच्या काळात ३७ हजार कोटींचे व्यवहार होऊ शकले नाहीत. सर्वसामान्य नागरिकांवर या संपाचा फारसा परिणाम झाला नसला तरी उद्योजक, व्यावसायिक यांना अडचणींना सामोरे जावे लागले. या काळात ३८ लाख चेक क्लिअरिंगला जाऊ शकले नसल्याने अडचण आल्याचे समजते.

ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे महासचिव सीएच वेंकटचलम यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्राच्या सरकारी बँक खासगीकरण विरोधात देशभरात बँक कर्मचाऱ्यांनी १६ व १७ डिसेंबर असा दोन दिवस संप केला. परिणामी अंदाजे ३७ हजार कोटींचे व्यवहार होऊ शकले नाहीत. देशातील तीन शहरे, दिल्ली, मुंबई आणि चेन्नई चेक क्लिअरिंग सेन्टर्स आहेत. चेन्नई मध्ये १०६०० कोटींचे सुमारे १० लाख चेक क्लीअर झाले नाहीत.मुंबई मध्ये  १५४०० कोटींचे १८ लाख चेक अडकले तर दिल्ली मध्ये ११ हजार कोटींचे ११ लाख चेक क्लीअर झाले नाहीत.

या संपाचा खासगी बँकांवर कोणताही परिणाम झाला नसला तरी आंतरबँक चेक व्यवहारांवर त्याचा प्रभाव पडला असल्याचे सांगितले जात आहे.