पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानच्या ‘ ऑर्डर ऑफ दुक ग्यालपो’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषविले गेले आहे. शुक्रवारी भूतानचे पंतप्रधान लोताय शेरिंग यांनी इंटरनेट मिडिया मध्ये ही घोषणा केली आहे. मोदींनी या सन्मानाबद्दल भूतानच्या राजाचे आभार मानले आहेत. प्रतिक्रिया देताना मोदी म्हणाले, ‘ भूतानच्या बंधूभगिनींकडून खूप प्रेम मिळाले. भूतान विषयी खूप प्रेमाच्या भावना हृदयात आहेत. भूतानच्या विकासासाठी जी मदत करणे शक्य आहे ती सर्व भारत करेल.’

पंतप्रधान मोदी यांना यापूर्वीही जगातील अनेक देशांनी सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा गौरव केला आहे. अमेरिकन सेनेतर्फे मोदींना ‘लिजन ऑफ द मेरीट’ सन्मान दिला गेला असून असामान्य सेवेसाठी हा सन्मान दिला जातो. त्यापूर्वी २०१९ मध्ये रशियाने ‘ ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू’ अॅवॉर्ड देऊन मोदींना गौरविले आहे.

सौदी अरेबियाने बिगर मुस्लीम परदेशी व्यक्तीसाठी दिले जाणारे सर्वात मोठे ‘अॅवॉर्ड ऑफ अब्दुल अजीज अल सौद’ मोदींना दिले आहे तर अफगाणिस्थानने नागरी सन्मान ‘स्टेट ऑफ गाजी अमीर अमानुल्लाह’ सन्मानाने मोदींना गौरविले आहे. पॅलेस्टीनने २०१८ मध्ये ‘ द ग्रांड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन’ सन्मान देऊन मोदींचा गौरव केला आहे तर मालदीवने २०१९ मध्ये मोदींना ‘ निशाण इजुद्दिन ‘ सन्मान दिला आहे.

बहारीनने २०१९ मध्ये मोदींना ‘द किंग हमाद ऑर्डर ऑफ रेन्सो अॅवॉर्ड’ ने गौरविले आहे. युएईने २०१९ मध्ये ‘ऑर्डर ऑफ जायद’ सन्मान दिला आहे. द. कोरियाने सियोल शांती पुरस्कार २०१९ देऊन मोदींचा गौरव केला आहे. याच वर्षी पर्यावरण क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याबद्दल दिला जाणारा ‘चँपियन ऑफ द अर्थ’ पुरस्कार मोदींना मिळाला असून २०१९ मध्ये फिलीप कोटलर प्रेसिडेंशियल अॅवॉर्ड मोदींना स्वच्छ भारत अभियानाबद्दल दिले गेले आहे. बिल आणि मेलिंडा गेट फौंडेशन ने २०२१ चा सेराविक ग्लोबल एनर्जी लीडरशिप पुरस्कार मोदींना दिला आहे.