टीम इंडिया साठी सचिन नव्या भूमिकेत! गांगुलीने दिले संकेत
टीम इंडियाचा माजी कप्तान आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याने बॅकरेज वूईथ बोरिया कार्यक्रमात बोलताना मास्टर ब्लास्टर टीम इंडियासाठी नव्या भूमिकेत येऊ शकेल असे संकेत दिले आहेत. काही काळापूर्वी भारतीय टीम मध्ये ‘फॅब फोर’ ची धूम होती. सचिन, सौरव, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे या फोरचे चार मुख्य पिलर मानले जात होते आणि जगभरातील गोलंदाज या खेळाडूना टरकून असत असे म्हटले जात होते.
दीर्घकाळानंतर पुन्हा एकदा हे फॅब फोर टीम इंडियामध्ये परत एकत्र येऊ शकतात असे संकेत मिळाले आहेत. पैकी टी २० वर्ल्ड कप नंतर राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे तर व्हीव्हीएस लक्ष्मणवर नॅशनल क्रिकेट अकादमीची जबाबदारी सोपविली गेली आहे. सौरव कार्यक्रमात बोलताना म्हणाला, ‘सचिन वेगळा खेळाडू आहे. प्रत्येक गोष्टीत सहभागी होणे त्याला आवडत नाही पण कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही भूमिकेतून तो टीम इंडियाशी जोडला गेला तर त्यासारखे भाग्य नाही. अर्थात त्यासाठी आम्हाला थोडे काम करावे लागेल.’
सचिनने एक काळ सल्लागार समितीमध्ये काम केले आहे पण तेथे वादविवाद सुरु झाल्यावर त्याने स्वतःला या जबाबदारीतून मोकळे करून घेतले होते. सचिनच्या कप्तानी खाली सौरव गांगुली खेळलेला आहे. सचिन सध्या थेट टीम इंडियाशी जोडलेला नाही मात्र आयपीएल मुंबई इंडियन्स टीमच्या स्टाफचा तो सदस्य आहे आणि टीमचा मेंटोर आहे.