शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंची मोदींकडे सायरस पूनावाला यांना भारतरत्न देण्याची मागणी


नवी दिल्ली – शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली आहे. श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सायरस पूनावाला यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली. सायरस पूनावाला यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात यावा, असे शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. सायरस पूनावाला यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस बनवणाऱ्या कंपनीची निर्मिती केली. लस बनवणारी ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मितीही मोठ्या प्रमाणात झाली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे सायरस पुनावाला हे वर्गमित्र हेत. सायरस पुनावाला यांनी पुण्यातील हडपसर भागात 1966 साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. सायरस पूनावाला यांना शर्यतीच्या घोड्यांमध्ये रस होता. घोड्यांच्या रक्ताचा उपयोग अनेक प्रकारच्या लसी तयार करण्यासाठी केला जातो. त्यातूनच सायरस पूनावाला हे लस निर्मितीच्या व्यवसायात उतरले आणि सीरम इन्स्टिट्यूटचा प्रवास सुरू झाला. सीरम इन्स्टिट्यूटकडून पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती येथे केली जाते.

आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवर ज्या लसींचा उपयोग केला जातो, त्यापैकी 65 टक्के लसी या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात. कोरोनावरील लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटचा ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्राझेनेका यांच्या सोबत करार झाला आहे. कोरोना काळात सीरम इन्स्टिट्यूटकडून देशभरात आणि विदेशातही लसपुरवठा करण्यात आला. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी याच कामाचा दाखला देत सायरस पूनावाला यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ठेवला आहे. श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सायर पूनावाला यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.