काल दिवसभरात 7 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद; तर 88 ओमिक्रॉनबाधित


नवी दिल्ली – जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात अद्याप कायम आहे. पण त्यात चिंता वाढवणारी बाब बाब म्हणजे, सध्या देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 7 हजार 447 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर देशात आतापर्यंत ओमिक्रॉनच्या 88 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 86 हजार 415 आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 76 हजार 869 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (गुरुवारी) 7886 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 62 हजार 765 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

देशव्यापी लसीकरण मोहिमेतंर्गत आतापर्यंत 135 कोटींहून अधिक कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहे. काल (गुरुवारी) 70 लाख 46 हजार 805 डोस देण्यात आले आहेत. ज्यानंतर आतापर्यंत लसीच्या 135 कोटी 99 लाख 96 हजार 267 डोस देण्यात आले आहेत.

दरम्यान ओमिक्रॉनच्या रुग्णांची गुजरात, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये नोंद झाल्यानंतर देशात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 88 वर पोहोचली आहे. सध्या महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. सध्या महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 32 रुग्ण आहेत, तर राजस्थानमध्ये 17, दिल्लीत 10, केरळात 5, गुजरातमध्ये 5, कर्नाटकात 8, तेलंगणात 7, पश्चिम बंगालमध्ये 1, आंध्र प्रदेश 1, तामिळनाडूत 1 आणि चंदिगढमध्ये 1 रुग्ण आढळून आले आहेत.