एनडीएच्या परीक्षेत तब्बल एक हजार मुली उत्तीर्ण


नवी दिल्ली : मुलींचा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएमध्ये प्रवेशासाठी मार्ग मोकळा झाल्यानंतर मुलींनी पहिल्याच संधीमध्ये आपली क्षमता दाखवून दिली आहे. तब्बल 1 हजार 2 मुली 14 नोव्हेंबरला झालेल्या सी डी एस ई लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. या सर्व मुलींच्या आता बौद्धिक, शारिरीक आणि मानसिक क्षमतेच्या चाचण्या होतील आणि या कठोर चाचण्यांमधून केवळ 19 जणींना एनडीएमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

ही लेखी परीक्षा देशभरातील 1 लाख 77 हजार 654 मुलींनी दिली होती. आजवर महिला अधिकाऱ्यांना चेन्नईमधील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधून प्रशिक्षण घेता येत असे, मात्र आता एनडीएचाही मार्ग मोकळा झाला आहे आणि मुली त्या संधीचे सोने करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

अजय भट्ट यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, ही परीक्षा 14 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आली होती. राज्यसभेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार या परीक्षेला 5,75,856 एवढे विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 1,77,654 या फक्त मुली होत्या. एनडीए उत्तीर्ण केलेल्या मुलींची एसएसबी मुलाखत आणि वैद्यकीय चाचण्या होणार आहेत. या 1002 मुलींपैकी 19 जणींची निवड केली जाईल.

2023 पासून एनडीएमध्ये (NDA) महिलांची पहिली बॅच सुरु होणार आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात याबाबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने ही बाब स्पष्ट केली होती. 2022 म्हणजे पुढच्या वर्षी मे पर्यंत एनडीएच्या प्रवेश परीक्षेत महिलांनाही संधी देणारी सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असे केंद्र सरकारने म्हटले होते. त्यानुसार सध्या प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. एनडीएची परीक्षा वर्षातून दोन वेळा होते.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने 18 ऑगस्ट रोजी यासंदर्भात दिलेल्या एका निकालानंतर महिलांना एनडीएचे दरवाजे खुले झाले होते. महिलांना एनडीएमध्ये प्रवेश नाकारणे ही लिंगभेद करणारी गोष्ट असल्याचे सांगत न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल दिला होता. त्यानंतर केंद्र सरकारने तयारीसाठी किमान या वर्षाची सवलत मिळावी, अशी विनंती केली होती.