निलेश राणेंचा खळबळजनक दावा; अजित पवारांना होऊ शकते कधीही अटक


कुडाळ – सध्या राज्य सरकारमधील काही मंत्री आणि इतर नेत्यांविरोधात ईडी, सीबीआय किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. निलेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना कधीही अटक होऊ शकते, असे म्हटले आहे. त्यांनी हा दावा कुडाळमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. तसेच, अजित पवार अजूनही जामिनावरच बाहेर असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.

निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर जिल्हा बँक निवडणुकीच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीच्या हातातून जिल्हा बँक कधीच गेली आहे. म्हणून त्यांना अजित पवारांकडून एक्सटेन्शन मिळाले. जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यासाठी अजित पवारांनी मदत केली. आता निवडणूक होईल, तेव्हाही आम्हीच जिंकणार आहोत. पण त्यांना एवढा काळ का लागला, कारण त्यांना ती बँक टिकवायची कशी, हेच कळले नसल्याचे निलेश राणे म्हणाले.

राज्यात ते आपापलेच दुकान बघत आहेत. शिवसेनेला धरूनच राष्ट्रवादी या सगळ्या गोष्टी चालवत आहे असे नाही. तिथेही सगळे आपापले दुकान मांडूनच चालले आहेत. शह-काटशह सुरूच आहेत. यांचा हेतूच फक्त पैसे, सत्ता, सत्तेतून पैसा हा आहे. पैसा मिळवण्यासाठीच ते सत्तेत आहेत. महाराष्ट्राने ही आघाडी स्वीकारलेली नसून तडजोडीतून आलेली आघाडी आहे. त्यांना जिथे कुठे फावडा मारायला संधी दिसेल, तिथे ते मारणार. ही काही जनतेसाठी आघाडी झालेली नाही. तीन डाकू एका गावावर डाका टाकण्यासाठी एकत्र येतात, तसे आहे हे, असे निलेश राणे म्हणाले आहेत.

वेगवेगळ्या भ्रष्टाचारांमध्ये रोज मंत्री अडकत आहेत. धनंजय मुंडेसारखे मंत्री वाढदिवसाला यूपीतले डान्सर बोलवून कार्यक्रम करत आहेत. जितेंद्र आव्हाड इंजिनिअरला घरात घेऊन मारत आहेत. अंगावर आले की केंद्रावर ढकलायचे हेच काम हे करत असल्याचेही निलेश राणे म्हणाले.