मोदी सरकारचे निर्णय चुकीचे असतील, पण भावना चुकीची नव्हती – अमित शहा


नवी दिल्ली – मोदी सरकारचे काही निर्णय चुकीचे असू शकतील, पण त्यामागे असणारी सरकारची भावना मात्र स्वच्छ होती, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. अमित शहा फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (FICCI) ९४ व्या वार्षिक संमेलनात बोलत होते. लोकशाहीवरील देशातील १३० कोटी लोकांचा विश्वास अजून वाढला आहे, हेच मोदी सरकारचे सर्वात मोठे यश असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले. फिक्कीचे देशाच्या विकासात योगदान कौतुकास्पद असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

अमित शहा म्हणाले की, मोदी सरकारचा निर्णय चुकीचा आहे, असे होऊ शकते. पण भावना चुकीची नव्हती. पुढे बोलताना त्यांनी गेल्या सात वर्षात देशात खूप मोठे बदल पहायला मिळाल्याचे आमच्यावरील टीकाकारही मान्य करतात, असे म्हटले आहे. भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप सरकारवर लागलेला नाही. सर्वांशी सल्लामसलत केल्यानंतरच सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

मोदी सरकारने कोरोना संकटादरम्यान असे अनेक निर्णय घेतले, ज्याचा फायदा पुढील बऱ्याच काळापर्यंत होईल, असे अमित शहा म्हणाले. अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असून देशाचा आर्थिक दर दुहेरी अंकी झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नसल्याचा विश्वास अमित शहा यांनी यावेळी व्यक्त केला. अमित शहा यांनी यावेळी सांगितले की, ८० कोटी लोकांना दीड वर्षाहून अधिक काळ प्रति व्यक्ती /दर महिना मोफत अन्न देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. हे काम खूप मोठे असून, जगात असे कोणीही केलेले नाही. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने आपल्या मार्गावर येत आहे.

अमित शहा फिक्कीचे कौतुक करताना म्हणाले की, १९७२ पासून आजपर्यंत देशाच्या विकासात फिक्कीचे योगदान आहे. आता ते योगदान अनेक टक्क्यांनी वाढवण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावे आणि इतर क्षेत्रांचाही विचार करावा ही वेळ आली आहे. फिक्कीसारख्या संघटना पुढे आल्या तरच आत्मनिर्भर भारताचे ध्येय पूर्ण होऊ शकते.