भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांच्या एकजुटीसोबतच अजूनही काही गोष्टी आवश्यक, प्रशांत किशोर यांचा विरोधकांना सल्ला!


नवी दिल्ली – २०१४मध्ये भाजपसाठी निवडणूक रणनितीचे नियोजन करणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपविरोधातील विरोधी पक्षांच्या आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रशांत किशोर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या भाजपविरोधी विरोधी पक्षांच्या आघाडीचे समर्थन करताना दिसत आहेत. त्यांनी त्यासाठी प्रयत्न देखील सुरू केले आहेत. पण यासंदर्भात प्रशांत किशोर यांची भूमिका वेगळी आहे.

प्रशांत किशोर यांना इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ममता बॅनर्जी विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी एवढेच पुरेसे ठरणार नाही, अशी भूमिका मांडली. भाजपला हरवण्यासाठी विरोधकांनी फक्त एकत्र येणे पुरेसे ठरणार नाही. तर विरोधी पक्ष भाजपविरोधात एकत्र आले, तर एक मजबूत संघटन उभे रहाताना दिसू शकेल. पण त्या आघाडीने भाजपविरोधात निवडणूक जिंकणे ही पूर्णपणे वेगळी बाब आहे. आपण याआधी देखील पाहिले आहे की भाजपने अशा आघाड्यांना पराभूत केल्याचे प्रशांत किशोर म्हणाले.

प्रशांत किशोर यांनी यासंदर्भात बोलताना उत्तर प्रदेश निवडणुकांचे उदाहरण दिले. उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये आपण हे पाहिले आहे. भाजपविरोधात समाजवादी, बसपा आणि इतर पक्ष मिळून उभे राहिले. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आसाममध्ये देखील महागठबंधनला भाजपविरोधात पराभूत व्हावे लागले. हे जे काही घडले, त्यातून धडा घ्यायला हवा. फक्त भाजपविरोधात इतर विरोधी पक्षांनी एकत्र येणे हाच विजयाचा मूलमंत्र होऊ शकत नसल्याचे म्हणत प्रशांत किशोर यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

प्रशांत किशोर यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी यावेळी बोलताना विरोधकांना सल्ला दिला आहे. भाजपच्या विरोधात फक्त विरोधी पक्षांच्या एकत्र येण्यामुळे लोक त्यांना मतदान करणार नाहीत, असे मला वाटतं. तुमच्याकडे त्यासाठी एक चेहरा असायला हवा. एक नरेटिव्ह असायला हवा. त्यानंतर इतर गोष्टी येतात, असे प्रशांत किशोर म्हणाले.