पाकिस्तानच्या दिवाळखोरीवर भाष्य करणाऱ्या महसूल मंडळाच्या माजी अध्यक्षांनी टोचले इम्रान खान सरकारचे कान!


इस्लामाबाद – कायमच दहशतवादी कारवाया आणि काश्मीरविषयी आक्रमक भूमिका याच बाबतीत भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानचा संदर्भ येत असल्याचे दिसून येते. पण, पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीविषयी चर्चा आणि तीही पाकिस्तानच्याच महसूल मंडळाच्या माजी अध्यक्षांच्या वक्तव्यामुळे सुरू झाली आहे. त्यांचे नाव शब्बर झैदी असे असून त्यांनी पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीविषयी हॅम्बर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एका चर्चासत्रात बोलताना सविस्तर भाष्य केले आहे.

सध्या दिवाळखोरीची परिस्थिती पाकिस्तानमध्ये असून देश प्रगती करत असल्याचे दावे करत फसवणूक करण्यापेक्षा दिवाळखोरी मान्य केल्यास उपाय शोधायला मदत होईल, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू झाल्यानंतर आपण सविस्तर प्रेझेंटेशन दिले असून फक्त ३ मिनिटांची क्लिपच चर्चेत आल्याची नाराजी त्यांनी ट्विटरवर बोलून दाखवली आहे.


दरम्यान, यावेळी शब्बर झैदी यांनी पाकिस्तानच्या प्रगतीविषयी दावे करणाऱ्या केंद्र सरकारचे आणि पंतप्रधान इम्रान खान यांचेही कान टोचले आहेत. मला वाटते की पाकिस्तानचे दिवाळे निघाले आहे. अडचणीवर उपाय शोधण्यासाठी देशाचे दिवाळे निघाल्याचे मान्य करणे महत्त्वाचे आहे. देश प्रगती करत आहे हा दावा करून लोकांना फसवण्यापेक्षा आर्थिक संकट मान्य करून त्यावर उपाय शोधणे जास्त चांगले असल्याचे झैदी म्हणाले.

हे चर्चासत्र १५ डिसेंबरला झाल्यानंतर त्यांचे भाष्य व्हायरल होऊ लागले. त्यानंतर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. अर्ध्या तासाचे मी प्रेझेंटेशन दिले होते. पण त्यातील फक्त ३ मिनिटांचा भाग घेतला गेला. हो, मी तसे म्हणालो होतो. सध्याची आर्थिक तुटीची परिस्थिती पाहाता आर्थिक संकट दिसून येत आहे. जे मी बोललो, त्याला आधार असल्याचेही झैदी यांनी म्हटले आहे.