खंडणी आणि अपहरण प्रकरणी भाजप नगरसेविकेच्या मुलासह तिघांविरोधात गुन्हा दाखल


मुंबई : नवघर पोलीस ठाण्यात भाजपच्या मुलुंड येथील नगरसेविका रजनी केणी यांच्या मुलांसह तिघांविरोधात खंडणी आणि अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यावरही आरोप होऊ लागले आहेत. यातील तीन आरोपींपैकी मनोज जाधव याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पण निमितला पोलिसांनी सूट दिली आहे.याचाच फायदा घेऊन नमित फरार झाला आहे.

हा गुन्हा पालिकेच्या एका कंत्राटदराने दाखल केला आहे. केणी यांच्या विभागात असलेले एक काम ऑनलाइन टेंडरमध्ये त्या कंत्राटदारला लागले होते. पण त्याने हे टेंडर मागे घ्यावे म्हणून केणी यांचा मुलगा नमित केणी याने त्या कंत्राटदारला कार्यालयात बोलावून धमकावले आणि टेंडर मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर मनोज जाधव आणि गोविंद जाधव यांच्या मदतीने त्याला बळजबरीने पालिका टी विभागात नेण्यात आले आणि तिथे कंत्राटमागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप या कंत्राटदारने तक्रारीत केला आहे. जेव्हा गुन्हा दाखल झाला, तेव्हा नमितची हळद होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न तर तिसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती. लग्नातील सर्व कार्यक्रमांना भाजपचे लोकप्रतिनिधी आणि नेते देखील उपस्थित होते. पण पोलिसांनी तेव्हा त्याला अटक केली नाही आणि आता नमितशी पोलिसांचा संपर्कच होत नसल्यामुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. याबाबत स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नवघर पोलिसांवर आरोप केला असून आता किरीट सोमय्या गप्प का असा सवाल केला आहे.

सदर कंत्राटदार या प्रकरणी भीतीच्या छायेत असल्यामुळे त्याने बोलण्यास नकार दिला आहे. कोणाचाच फोन रजनी केणी आणि त्यांचे पुत्र देखील उचलत नाहीत. तर नवघर पोलीस आणि संबंधित अधिकारी यांनी देखील कॅमऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. आम्ही सदर प्रकरणात नमितला नोटीस दिल्याचे आणि आता त्याचा शोध घेत असल्याचे पोलीस सांगत आहेत. पण या सर्व प्रकारामुळे पोलीसही संशयाच्या घेऱ्यात आले आहेत.