नवाब मलिकांचा आरोप; भाजपचा एससी, एसटीचेही आरक्षण संपवायचा प्रयत्न


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रातील भाजप सरकार राजकीय आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. मलिक यांनी म्हटले आहे की, एससी, एसटीचेही आरक्षण संपवण्याचा भाजपचा अजेंडा आहे. राज्याने आरक्षणविना निवडणुका घेणार नसल्याचे ठरवले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आरक्षण न दिल्यास निर्माण होऊ शकतो. ओबीसी आरक्षणाचा पेच न्यायालयाच्या आदेशानुसार झाला आहे. याला केंद्र सरकार जबाबदार आहे. राजकीय आरक्षण संपले पाहिजे, अशी भूमिका त्यांची आहे. मंडल आयोगाच्या माध्यमातून ज्यावेळी ओबीसी आरक्षण येणार होते, त्यावेळी अभाविपने त्याला विरोध केला होता. आता देखील भाजपने छुप्या मार्गाने न्यायालयात विरोधातील याचिका टाकली होती. 27 टक्के आरक्षण गेल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे मलिक यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक म्हणाले की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो, त्याचबरोबर आम्ही आयोगाला 400 कोटी रुपये देत आहोत. हिंदवी आणि हिंदू असा शब्दांचा खेळ भाजपने खेळू नये. महाराजांनी धर्माच्या आधारावर कधीही राजकारण केले नसल्याचे मलिक म्हणाले. नवाब मलिक बैलगाडी शर्यतीवर बोलताना म्हणाले की, देशभरात शेतकऱ्यांच्या माध्यमातून बैलगाडी शर्यत आयोजित केली जाते. जलीकट्टू शर्यत न्यायालयाच्या माध्यमातून सुरू होते. आम्ही देखील बैलगाडा शर्यत सुरू करा अशी मागणी न्यायालयात आम्ही केली होती. तशी बाजू आम्ही न्यायालयात मांडली आणि त्यात यश आले, असे मलिक म्हणाले.

त्यांनी जैतापूर प्रकल्पसंदर्भात बोलताना म्हटले की, जैतापूर प्रकल्प बळजबरीने राबवू नका. स्थानिकांना विश्वासात घेणे पहिल्यांदा गरजेचे आहे. एकतर्फी निर्णय घेऊ नका. केंद्राला आम्ही आमची भूमिका कळवू, असे ते म्हणाले. निधिवाटपावर बोलताना ते म्हणाले की, पक्षाला निधी दिला जात नाही. विकासकामाला निधी दिला जातो, असे मलिक म्हणाले.