महाराष्ट्रातील 32 पैकी 25 जणांची ओमिक्रॉनवर यशस्वी मात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती


नवी दिल्ली – संपूर्ण जगाची चिंता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनने वाढवली आहे. ओमिक्रॉनबाधितांच्या आकडेवारीत दररोज वाढ होत आहे. त्यातच आता देशातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या शंभरीपलीकडे गेली आहे. याबाबत माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशातील 11 राज्यांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. मागील 20 दिवसांत देशातील दैनंदिन नव्या कोरोनाबाधितांची नोंद दहा हजारांपेक्षा कमी झाली आहे. पण ओमिक्रॉनचे स्वरुप आणि इतर देशातील वाढत्या ओमिक्रॉनबाधितांची संख्या पाहाता आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. 11 राज्यात ओमिक्रॉनचे 101 रुग्ण झाले आहेत.

पत्रकारांशी बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देत म्हटले की, दक्षिण आफ्रिकेत डेल्टा व्हेरियंटपेक्षा ओमिक्रॉन व्हेरिएंट अधिक वेगाने पसरत आहे. ज्या ठिकाणी समुह संसर्गाची (कम्युनिटी ट्रांसमिशन) शक्यता असते, त्या ठिकाणी ओमिक्रॉनचा प्रसार डेल्टापेक्षा अधिक वेगाने होऊ शकतो. ओमिक्रॉन जगभरात अतिशय वेगाने पसरत आहे. भारतातही याचा प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे गरज नसल्यास प्रवास करणे टाळायला हवे. जिथे समूह संसर्गाची भीती आहे, अशा ठिकाणी जाणे टाळावे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. नव्या वर्षाचे स्वागत साधेपणाने करण्याची गरज आहे. ओमिक्रॉन विरोधात लस प्रभावी ठरत नसल्याचे अद्याप कोणत्याही संशोधनातून समोर आलेले नाही. त्यामुळे सर्वांनी लसीकरण लवकरात लवकर करणे गरजेचे असल्याचेही अग्रवाल म्हणाले.

महाराष्ट्रात ओमिक्रॉनबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 32 ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. त्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये 22 रुग्णांना ओमिक्रॉनची बाधा आहे. तर राज्यस्थानमध्ये 17 जणांना ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली असल्याची माहिती लव अग्रवाल यांनी दिली. दक्षिण आफ्रिका देशात उदयास आलेल्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार जगभरात वेगाने होत आहे. हा विषाणू याआधीच्या सर्व विषाणूंपेक्षा अधिक जलदगतीने पसरत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. पण या विषाणूची लक्षणे आधीच्या तुलनेत काहीशी सौम्य असली, तरी याच्या प्रसाराची गती धोकादायक आहे.

देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या – महाराष्ट्र – 32, दिल्ली-22, राजस्थान- 17, कर्नाटक- 8, तेलंगणा- 8, केरळ- 5, गुजरात- 5, पश्चिम बंगाल-1, आंध्र प्रदेश 1, चंडीगढ-1, तामिळनाडू-1