हा आहे मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स स्पर्धेतील फरक

नुकतीच १२ डिसेंबर रोजी इस्रायल येथे मिस युनिव्हर्स २०२१ सौंदर्य स्पर्धा पार पडली आणि भारताच्या हरनाज संधू हिने विश्वसुंदरीचा मुकुट शिरावर घेऊन देशाची शान वाढविली. आत्ता मिस वर्ल्ड स्पर्धेचा बिगुल वाजला असून येत्या गुरुवारी ही स्पर्धा होत आहे. त्यात भारताची मानसा वाराणसी भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. अनेकांना या दोन स्पर्धात नक्की फरक काय याची माहिती नसते. मिस वर्ल्ड म्हणजे मराठी भाषेत जगतसुंदरी आणि मिस युनिव्हर्स म्हणजे विश्वसुंदरी. या दोन्ही स्पर्धा सौंदर्य स्पर्धा आहेत आणि त्यात जगभरातील अनेक देश सहभागी होतात. दरवर्षी या स्पर्धा घेतल्या जातात. त्यात स्पर्धकाचा चेहरा, देहबोली, विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा, हुशारी आणि चाणाक्षपणा लक्षात घेऊन ज्युरी सुंदरीची निवड करतात.

या दोन्ही स्पर्धा दोन वेगळ्या संस्थांतर्फे घेतल्या जातात. मिस युनिव्हर्स स्पर्धेची सुरवात कपडे कंपनी पॅसिफिक मिल्सने १९५२ मध्ये कॅलिफोर्निया येथे केली. तर मिस वर्ल्ड १९५१ मध्ये युके मध्ये प्रथम भरविली गेली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धा आहेत.

मिस वर्ल्ड संस्थेच्या अध्यक्ष ज्युलिया मोर्ले या असून त्यांच्या पतीने या स्पर्धेची सुरवात केली होती. तर मिस युनिव्हर्स स्पर्धा संस्थेच्या अध्यक्ष पॉला शोगर्ट असून त्यांच्या पूर्वी या संस्थेचे अध्यक्षपद अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भूषविले होते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १८ ते २८ वयोगटातील अविवाहित मुली अर्ज करू शकतात. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय पातळीवरची सौदर्यस्पर्धा जिंकलेली असणे बंधनकारक आहे. या स्पर्धेत जगातील १०० हून अधिक देश सहभागी होतात.

मिस वर्ल्ड साठी अर्ज करणाऱ्या स्पर्धकाने त्या त्या देशाचा खिताब जिंकलेला असावा लागतो. म्हणजे भारताच्या स्पर्धकाला मिस इंडिया खिताब जिंकावा लागतो. वर्षअखेरी या स्पर्धेचे फॉर्म दिले जातात. वेबसाईटवर त्या संबंधी सर्व माहिती दिली गेली आहे.

मिस वर्ल्डचा खिताब सर्वाधिक वेळा व्हेनेझुएलाच्या स्पर्धकांनी जिंकला आहे तर मिस युनिव्हर्सचा खिताब सर्वाधिक वेळा युएसए ने जिंकला आहे. मिस वर्ल्ड स्पर्धेत भारतातर्फे रिता फरिया (१९६६), ऐश्वर्या राय (१९९४), डायना हेडन (१९९७), युक्ता मुखी (१९९९), प्रियांका चोप्रा (२०००), मानुषी छील्लर (२०१७) यांनी यश मिळविले तर मिस युनिव्हर्स मध्ये सुश्मिता सेन (१९९४), लारा दत्ता (२०००) आणि हरनाज संधू २०२१ यांनी यश मिळविले आहे.